संगमनेर : दहा वर्षांनंतर रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी; शेतकर्‍यांमध्ये समाधान | पुढारी

संगमनेर : दहा वर्षांनंतर रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी; शेतकर्‍यांमध्ये समाधान

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील 4 शेतकर्‍यांना आपल्या घरापर्यंत तसेच 15 शेतकर्‍यांना त्यांच्या शेतामध्ये जाण्या- येण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून रस्ताच नव्हता. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांना अनेक अडचणी येत होत्या. मात्र आपला रस्त्याचा कायम स्वरूपीचा प्रश्न मार्गी लागेल म्हणून परिसरातील शेतकर्‍यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानातून या चारही शेतकर्‍यांचे आपल्या शेती व घरापर्यंत जाण्या येण्यासाठीच्या रस्त्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे

संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथे राहत असणारे विठ्ठल बाजीराव नेहे, जालिंदर सोपान नेहे, शांताराम सोपान नेहे, रावसाहेब यादव नेहे या चार शेतकर्‍यांना घरापर्यंत जाण्यासाठी पायी वाट सुद्धा व्यवस्थित राहिलेली नव्हती. तर रघुनाथ लहानू नेहे, नंदराम सीताराम नेहे, बाळासाहेब सीताराम नेहे, रोहित सोमनाथ नेहे, मनाजी मार्तंड नेहे आदी दहा शेतकर्‍यांना त्यांच्या पंधरा हेक्टर शेतीत जाण्या-येण्यासाठी रस्त्याची अतिशय गैरसोय होती.

या शेतकर्‍यांना आपला शेतमाल सुमारे एक ते दीड किलोमीटरपर्यंत डोक्यावर वाहून न्यावा लागत होता. त्यामुळे या शेतकर्‍यांना मानसिक, शारीरिक त्रास सहन करावा लागत असे. आपल्या गावातील शेतकरी बांधवांची ही अनेक वर्षांची रस्त्याची समस्या सोडविण्यासाठी गावचे पोलिस पाटील गोरक्ष नेहे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भारत नेहे या दोघांनी पुढाकार घेत संबंधित शेतकर्‍यांशी चर्चा केली आणि ही माहिती का. पो. नेहे यांनी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांना दिली.

महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानातून हा रस्ता खुला करण्याची एक चांगली संधी असल्याचे प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी शेतकर्‍यांना पटवून दिले. त्यानंतर या सर्व दहा शेतकर्यांनी हा रस्त्या तयार करण्यासाठी सहमती दर्शविली. मात्र रस्ता तयार करताना रघुनाथ नेहे, विठ्ठल नेहे, सोपान नेहे यांचे घरांची आनंदराम नेहे यांच्या शेततळ्याची अडचण होत होती. परंतु आपल्या रस्त्याची कायमस्वरूपीची समस्या सुटत असल्याने या शेतकर्‍यांनी आपल्या घराचा व शेतत ळ्याचा विचार न करता मनाचा मोठेपणा दाखवत हा रस्ता खुला करून देण्यास सहमती दर्शवली. त्यामुळे रस्ता झाला.

मंडलाधिकारी कामगार तलाठी, ग्रामसेवक, यांचा संप सुरू असताना गावपातळीवरील शासन प्रतिनिधी म्हणून पोलिस पाटील गोरक्ष नेहे यांनी गेल्या दहा वर्षांपासून अडचणीचा ठरलेला रस्ता महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानातून खुला करण्यास पुढाकार घेतला आहे.
                                        – अमोल निकम, तहसीलदार, संगमनेर

Back to top button