सांगली : आष्टा येथे निनाईदेवी पालखी सोहळा उत्साहात | पुढारी

सांगली : आष्टा येथे निनाईदेवी पालखी सोहळा उत्साहात

आष्टा; पुढारी वृत्तसेवा : वारणा व चांदोली धरणग्रस्तांचे ग्रामदैवत श्री निनाईदेवीच्या यात्रेनिमित्त देवीचा पालखी सोहळा येथील चांदोली वसाहतीत मोठ्या उत्साहात झाला. शिराळा तालुक्यातील पेटलोंढ येथील गावकर्‍यांचे वारणा प्रकल्प उभारणीनंतर आष्टा येथे पुनर्वसन करण्यात आले आहे.

येथील चांदोली वसाहतीमधील निनाईनगरमध्ये हे धरणग्रस्त बांधव आपले ग्रामदैवत निनाईदेवीची यात्रा प्रतिवर्षी होळी पौर्णिमेपासून रंगपंचमीपर्यंत पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरी करतात.

यावर्षी यात्रेनिमित्त सर्व भाविकांनी श्री निनाई देवी, श्री आदिष्टा देवी व श्री केदारलिंग यांची पूजा व आरती केली. धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सायंकाळी निनाईदेवीच्या पालखीची मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. भाविकांनी पालखीवर गुलाल व खोबर्‍याची उधळण केली. निनाईदेवी मित्र मंडळ, सर्व भाविकांच्यावतीने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील चांदोली वसाहतीमधील भाविक उपस्थित होते.

Back to top button