सिलिंडरमधून गॅसची चोरी अन्… गाडीची पार्टी बेतली जीवावर ! | पुढारी

सिलिंडरमधून गॅसची चोरी अन्... गाडीची पार्टी बेतली जीवावर !

वडगाव मावळ : खोलीमध्ये झालेली गॅसची गळती आणि दारूच्या नशेत पेटवलेल्या लायटरमुळे भडका झाला व आगीत भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना वडगाव मावळ येथे घडली. दरम्यान, अवैधरित्या सिलिंडरमधून गॅसची चोरी आणि मित्राने घेतलेल्या नवीन गाडीची पार्टी या चार मित्रांच्या चांगलीच अंगलट आली.

हा प्रकार 27 फेब्रुवारीला वडगाव मावळ येथे ते राहत असलेल्या खोलीत घडला. भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि जप्त केलेले सिलिंडर, शेजार्‍यांकडून मिळालेली माहिती यावरून संबंधित चौघेजण सिलिंडरमधून गॅसची चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

संदीप अशोक राऊत (वय 33), बबन रमेश बिरादार (वय 26) भरत रावसाहेब फावडे (वय 33) अशी भाजून मृत्यू झालेल्यांची नावे असून, मनोज देविदास पाटील (वय 30, रा. वडगाव मावळ) याच्यावर बेंबडे हॉस्पिटल, औरंगाबाद येथे उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

‘तो’ मात्र अद्याप अज्ञातच
जप्त केलेले सिलिंडर हे प्रामुख्याने एचपी कंपनीचे व भारत गॅस, इंडेन, हिंद कंपनीचे आहेत. तसेच, यातील मयत बबन बिरादार हा पूर्वी येथील अनुराग गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर वितरित करण्याचे काम करत होता. संबंधित चौघेजण गॅसची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले असले तरी त्यांच्याकडे हे सिलिंडर आले कुठून?, ते कोणत्या एजन्सीचे आहेत? हे प्रश्न मात्र अनुत्तरित असून, पोलिसांनी बेकायदा सिलिंडर पुरवणार्‍या ज्या अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ’तो’ कोण हे अद्याप निष्पन्न झालेले नाही.

शेजारी आले मदतीला धावून
दरम्यान, आसपासचे शेजारी, पोलिस यांनी तातडीने चारही जणांना रुग्णालयात हलवले. तसेच, आग विझवण्याचा प्रयत्न केला. या चौघांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा टप्प्याटप्प्याने मृत्यूही झाला. अवैधरित्या सिलिंडरमधून गॅसची चोरी करणे किती गंभीर आहे व कशापद्धतीने जीवावर बेतू शकते हे या घटनेतून समोर आले आहे.

44 सिलिंडर पोलिसांनी केले जप्त
पोलिसांनी घरगुती वापराचे एच. पी. कंपनीचे 34 सीलबंद सिलिंडर, घरगुती वापराचे एचपी कंपनीचे 6 सीलबंद नसलेले सिलिंडर, भारत गॅस कंपनीचे सीलबंद नसलेले 2 कमर्शियल, तसेच सीलबंद नसलेले इंडेन व हिंद कंपनीचे प्रत्येकी एक सिलिंडर असे एकूण 44 सिलिंडर, याशिवाय एक गॅस शेगडी, दारूच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. संबंधित सिलिंडर हे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या आदेशाने सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.

गॅस गळतीमुळे दुर्घटना
संबंधित चौघेजण एका गॅस एजन्सीकडे सिलिंडर पोहोचवायचे काम करत होते. या कामाचा गैरफायदा घेऊन ते सिलिंडरमधून गॅसची चोरी करत होते. यापैकी बबन बिरादार याने एक नवीन दुचाकी खरेदी केली होती. त्या दुचाकीची पूजा करून त्यांनी या नवीन गाडीची पार्टी म्हणून वडगावमधील एका हॉटेलमध्ये दारूची पार्टी केली. त्यानंतर ते त्यांच्या खोलीवर गेले. दरम्यान, आधीच रेग्युलेटरमधून गॅसची गळती झालेली असल्याने व त्यात त्यांनी खोलीत गेल्यावर लायटर पेटविल्याने अचानक भडका झाला. या भडक्याने दारूच्या नशेत असलेले चारही जण होरपळून निघाले.

Back to top button