पुणे : सिंहगड रोड, शिवणे भागात आरोग्य सेवा ठप्प ; गरोदर महिला, बालकांचे लसीकरण रखडले | पुढारी

पुणे : सिंहगड रोड, शिवणे भागात आरोग्य सेवा ठप्प ; गरोदर महिला, बालकांचे लसीकरण रखडले

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : सरकारी कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपामुळे खडकवासला, धायरी, सिंहगड रोड, शिवणे, खानापूर भागांतील सरकारी आरोग्य सेवा ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव सुरू असतानाही या भागातील वीस हजारांवर गरोदर महिला, बालकांचे लसीकरण बंद आहे. संपावर लवकर तोडगा न निघाल्यास 0 ते 6 वयोगटातील बालकांसह गरोदर महिलांना नियमित लसीकरणाअभावी गंभीर आजारांना तोंड द्यावे लागणार असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

महापालिका आरोग्य सेवा देत नसल्याने तसेच खासगी, दवाखाने हॉस्पिटलच्या लसीकरणाचे महागडे दर कष्टकरी, मजूर व सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे या भागातील बालके, गरोदर महिलांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत.
लसीकरणासह बाळंतपण, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया साथ निदान आदी वैद्यकीय सेवा जिल्हा परिषदेच्या खडकवासला व सांगरूण आरोग्य केंद्राच्या वतीने पुरवल्या जात आहेत. संपामुळे सांगरूण केंद्राच्या कार्यक्षेत्रातील शिवणे व उत्तमनगर येथील आरोग्य उपकेंद्रातील लसीकरण बंद आहे. अशीच गंभीरस्थिती खडकवासला आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील नांदेड, खडकवासला, धायरी,किरकटवाडी आदी ठिकाणी आहे. 0 ते 6 वयोगटातील बालकांसह गरोदर महिलांचे लसीकरण सध्या ठप्प झाले आहे.
खडकवासला आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शब्दा शहापूरकर म्हणाल्या की, सरकारी कर्मचार्‍यांसह राष्ट्रीय आरोग्य मिशनचे कर्मचारीही संपावर गेल्याने लसीकरण बंद
करावे लागले.

वैद्यकीय महाविद्यालयांची मदत घ्यावी…
बालके, गरोदर महिलांच्या आरोग्यास लसीकरण व अत्यावश्यक वैद्यकीय सेवेअभावी धोका निर्माण झाल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात. त्यासाठी या भागातील वैद्यकीय महाविद्यालये, नर्सिंग कॉलेजची मदत घ्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे व खडकवासलाचे माजी सरपंच सौरभ मते यांनी केली आहे.

Back to top button