पुणे : गुन्ह्यांच्या छड्यासाठी पोलिसांना ‘टास्क’ ! | पुढारी

पुणे : गुन्ह्यांच्या छड्यासाठी पोलिसांना ‘टास्क’ !

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वाहनचोरी, जबरी चोरी व घरफोडी या मालमत्तेच्या संदर्भातील गुन्ह्यांच्या छड्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना स्पेशल टास्क देण्यात आला आहे. त्यासाठी स्वतंत्र तीन पथके तयार करण्यात आली असून, प्रत्येकाला कामाची विभागणी करून देण्यात आली आहे. त्यांच्या कामकाजावर सहायक पोलिस आयुक्त लक्ष ठेवणार असून, अपर पोलिस आयुक्त, उपायुक्त यांना वेळोवेळी प्रगती अहवाल सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरात घरफोडी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी व वाहनचोरीच्या गुन्ह्यात मोठी वाढ होताना दिसून येत आहे.

दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत छडा लागण्याचे प्रमाण कमी आहे. पोलिस ठाणे स्तरावरदेखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे गुन्हे शाखेकडून अभ्यासात्मक पद्धतीबरोबरच तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करण्यात येतो आहे. या टास्कनुसार एका आठवड्यात अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत. पूर्वी घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करीत असताना, प्रत्यक्ष घटनास्थळाचे चित्रण, तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज, गुन्हेगाराची माहिती घेतली जाते आहे.

आठवड्यात विविध गुन्ह्यांत अटक केलेले आरोपी प्रत्येक मंगळवारी आयुक्तालयात घेण्यात येणार्‍या मिटिंगमध्ये हजर केले जातात. तेथे प्रत्येक अधिकारी त्यांची माहिती घेतात. ते पूर्वी कोणत्या गुन्ह्यात आपल्या पोलिस ठाण्यात अटक होते का ? हे पडताळून पाहिले जाते. तसेच, ते कोणत्या परिसरात सतत गुन्हे करतात ? त्यांची गुन्हे करण्याची पद्धती काय आहे ? त्यांनी आत्तापर्यंत शहरात कोण-कोणत्या प्रकारचे गुन्हे केले ? या माहितीचे आदान-प्रदान केले जाते.

गुन्हे शाखेच्या तीन युनिटना हे काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे शहरात वाहनचोरीचे प्रमाण मोठे आहे. प्रत्येक दिवशी शहरातून सहा ते सात वाहने चोरीस जातात. त्यामध्ये दुचाकी, चारचाकी व तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. मात्र, चोरी गेल्यानंतर ती वाहने परत मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

 

मालमत्तेच्या संदर्भातील गुन्ह्यांच्या तपासासाठी तीन पथकांची स्थापना करण्यात आली आहे. घरफोडी, जबरी चोरी व वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे काम त्यांना देण्यात आले आहे. सहा दिवसांत अकरा गुन्ह्यांचा तपास त्यांनी लावला आहे. लवकरच आणखी सकारात्मक परिणाम दिसतील.
                                                      – अमोल झेंडे, पोलिस उपायुक्त, गुन्हे

 

Back to top button