ST bus discount : महिलांसाठी आनंदाची बातमी! आजपासून  एस.टी. बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत  | पुढारी

ST bus discount : महिलांसाठी आनंदाची बातमी! आजपासून  एस.टी. बसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत 

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचा सन 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना एसटी बसच्या प्रवासात तिकीट दरात 50 टक्के सवलतीची घोषणा केली होती.  ही सवलत आजपासून (दि.१७) लागू करण्यात आली आहे. फडणवीस यांनी गुरुवारी (दि.9) अर्थसंकल्प मांडला होता. राज्यात सत्तेत येऊन शिंदे सरकारला जवळपास आठ महिने पूर्ण झाले. गेल्यावर्षी जूनअखेरीस सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. (ST bus discount)

ST bus discount : आजपासून ५० टक्के सवलत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मांडलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक महत्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली. त्यापैकी एसटी बसमध्ये प्रवास तिकीट दरात महिलांना 50 टक्के सवलतीची घोषणा करण्यात आली. हा निर्णय आजपासून (दि.१७) लागू करण्यात येत आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जाहीर केलेल्या परिपत्रकात म्हंटलं आहे की, महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत घोषित केली आहे. या घोषणेच्या अनुषंगाने दि. १७.०३.२०२३ पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत म्हणजेच राज्यांतर्गत धावणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बस प्रवास भाड्यामध्ये ५०% सवलत लागू करण्यात येत आहे. सदर सवलतीची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येणार आहे.

काय आहेत अटी आणि सूचना

सर्व महिलांना सर्व प्रकारच्या बसेसमध्ये ५०% सवलत लागू करणे बाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

  • सर्व महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या [साधी, मिडी/मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन आसनी, शिवशाही (आसनी), शिवनेरी, शिवाई (साधी व वातानुकुलीत ) इतर इत्यादी बसेसमध्ये ५० % सवलत दि.१७/०३/२०२३ पासून देण्यात येत आहे.
  • ही सवलत ही भविष्यात राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणा-या सर्व प्रकारच्या बसेस करिता देखील लागू राहील.
  • ही योजना ‘महिला सन्मान योजना ‘या नावाने संबोधण्यात येत आहे.
  • ही सवलत सर्व महिलांना महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपर्यंत लागू आहे.
  • ही सवलत शहरांतर्गत बस सेवा वाहतुकीस लागू नाही.
  • ज्या महिलांनी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचे प्रवासाचे आगाऊ आरक्षण तिकीट (Advance Booking) घेतलेले आहे. अशा महिलांना ५०% सवलतीचा परतावा देण्यात येऊ नये.
  • ही लागू केलेल्या दिनांक पूर्वीच्या आगाऊ आरक्षणावर केलेल्या प्रवासाचा परतावा देण्यात येऊ नये.
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात ५०% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवासी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे, विंडो बुकींगव्दारे, ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे, संगणकीय आरक्षणाद्वारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात यावा.
  • सर्व महिलांना प्रवास भाड्यात शासनाने ५०% सवलत दिली असल्याने ५०% प्रवास भाडे आकारले जाणार आहे. त्यामुळे प्रवास भाड्यातील अ. स. निधी व वातानुकुलित सेवांकरीता वस्तू व सेवाकरची रक्कम आकारण्यात यावी.
  • मॅन्युअल पद्धतीने तिकीट देण्याची कार्यवाही महिलांना दिलेल्या ५०% सवलतीच्या मूल्याची
  • परिगणित करणेसाठी स्वतंत्र तिकीट छपाई करावी लागेल. सदरची सवलत ही ५०% असल्यामुळे त्या तिकीटांचे वसूली मूल्य ५० % राहिल. प्रवास केलेल्या महिलांची एकूण संख्या समजावी याकरिता प्रत्येक महिलेस हे मूळ तिकीट वाहकाने दिलेच पाहिजे. (तिकीट रंगसंगती स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.)
  • सर्व महिलांना प्रवास भाडयात ५० % सवलत द्यावयाची असली तरी त्याची प्रतिपूर्ती शासनाकडे मागणीसाठी त्यांना ईटीआय- ओआरएस कार्यप्रणाली बंद पडल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून छापील तिकीटे देणे आवश्यक आहे. त्यासाठी रु.५/-, रु.१०/- मूल्यवर्गाची मूळ तिकीटे व रु. १०/-, रु. २०/- रु.३०/-, रु.४०/- रु. ५०/- व रु.१००/- मूल्यवर्गाची जोड तिकीटे देण्यात यावीत. सवलत इटीआय मशीनमध्ये ७७ क्रमांकावर प्राप्त होईल.
  • लेखाशीर्ष महिलांना देण्यात येणा-या विनामूल्य प्रवास सवलतीच्या रकमेची परिगनणा करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष देण्यात येत आहे. (याबाबत नंतर कळविण्यात येईल.) ७५ वर्षावरील महिलांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेच्या परिपत्रकीय सूचनेनुसार १००% सवलत लागू असेल. ६५ ते ७५ या वयोगटातील महिलांना ‘महिला सन्मान योजना’ हीच सवलत लागू असेल.

 

 हेही वाचा

Back to top button