Share Market Closing | शेअर बाजारात चढ-उतार, FMCG, फार्मा तेजीत, मेटल स्टाॅक्स घसरले | पुढारी

Share Market Closing | शेअर बाजारात चढ-उतार, FMCG, फार्मा तेजीत, मेटल स्टाॅक्स घसरले

Share Market Closing : अमेरिकेतील दोन बँका बुडाल्यानंतर आता युरोपमधील सर्वात मोठी बँक क्रेडिट सुइस (Credit Suisse) आर्थिक संकटात सापडली आहे. बँकिंग क्षेत्रातील या संकटाचे पडसाद आज गुरुवारी (दि.१६) शेअर बाजारात उमटले. या कमकुवत संकेतांमुळे जगभरातील गुंतवणूकदार चिंतेत आहे. यामुळे बाजारात आज अस्थिर परिस्थिती दिसून आली. आज सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्स सुमारे ३५० अंकांनी कोसळून ५७,२०० पर्यंत खाली आला. तर निफ्टी १६,८५० वर आला होता. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांनी काही वेळ स्थिर पातळीवर व्यवहार केला. तर दुपारच्या सत्रात सेन्सेक्स २५० अंकांनी वाढला. तर निफ्टी १७ हजारांवर गेला. त्यानंतर आज सेन्सेक्स ७८ अंकांच्या वाढीसह ५७,६३४ वर बंद झाला. तर निफ्टी १३ अंकांनी वाढून १६,९८५ वर स्थिरावला.

८ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांना फटका

आयटी आणि कॅपिटल गुड्स शेअर्समध्ये विक्री तर फार्मा, ऑईल आणि FMCG शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. १३ पैकी आठ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांना फटका बसला. फायनान्सियल स्टॉक्स ०.२ टक्के आणि आयटी शेअर्स ०.६ टक्क्यांनी घसरले. आर्थिक मंदीच्या भितीने निफ्टी मेटल सुमारे ३ टक्क्यांनी घसरला.

FMCG स्टॉक्समध्ये तेजी

बाजारातील स्थिती कमकुवत असतानाही FMCG स्टॉक्समध्ये आज तेजी दिसून आली. हे स्टॉक्स ८ टक्क्यांपर्यंत वाढले. यात नेस्ले इंडिया, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा कंन्झूमर प्रोडक्ट्स यांचा समावेश होता. एशियन पेंट्स, टायटन, पॉवर ग्रिड, अल्ट्राटेक, आयटीसी, सन फार्मा, एलटी, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स हेदेखील तेजीत राहिले. एशियन पेंट्स हा २ टक्क्यांहून अधिक वाढला. तर हिंदाल्को, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू, इंडसइंड बँक आणि ओएनजीसी हे टॉप लूजर्स होते. हे शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक घसरले.

अदानी ग्रीन, ICICI प्रुडेन्शियल लाइफ टॉप गेनर्स

अदानी ग्रीन एनर्जी (५ टक्के वाढ), हिंदस्तान पेट्रोलियम (४.८८ टक्के वाढ), ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स (६.५२ टक्के वाढ), भारत पेट्रोलियम (४.६८ टक्के वाढ), अदानी ट्रान्समिशन (३.५४ टक्के वाढ), टायटन (३.३६ टक्के वाढ) हे शेअर वधारले होते. दरम्यान, वेदांत लि.चा शेअर ३ टक्क्यांनी घसरला. तर पंतजली फूड्सच्या शेअर्संना ५ टक्क्यांच्या घसरणीसह लोअर सर्किट लागले.

आशियाई बाजारातही घसरण

बँकिग क्षेत्रातील संकटाची गुंतवणूकदारांनी धास्ती घेतली आहे. यामुळे आज आशियाई बाजारात घसरण पहायला मिळाली. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक २१८ अंकांनी घसरून २७,०१६ वर बंद झाला. टॉपिक्स निर्देशांकही १.१७ टक्क्यांनी खाली येऊन १,९३७ वर स्थिरावला. (Share Market Closing)

क्रेडिट सुईस शेअर ४० टक्क्यांनी वधारला, स्विस सेंट्रल बँकेकडून आर्थिक पाठबळ

स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेने क्रेडिट सुईसला आर्थिक पाठबळ देण्याच्या निर्णयामुळे क्रेडिट सुईस ग्रुप एजीच्या शेअर्समध्ये तब्बल ४० टक्के वाढ झाली. स्विस नॅशनल बँकेने क्रेडिट सुईसला ५४ अब्ज डॉलर कर्ज मंजूर केले आहे. स्विस बँक क्रेडिट सुइस ग्रुप एजीचे शेअर बुधवारी ट्रेडिंग दरम्यान २५ टक्क्यांहून अधिक घसरून निच्चांकी पातळीवर गेले होते. गेल्या ५ दिवसांत बँकेच्या शेअरमध्ये ४० टक्क्यांपर्यंत घसरण झाली. या पार्श्वभूमीवर क्रेडिट सुइसने गुरुवारी सांगितले की ते स्विस सेंट्रल बँकेकडून ५४ अब्ज डॉलरपर्यंत कर्ज घेऊन आपली तरलता मजबूत करतील. या निर्णयामुळे युरोपातील बाजारातही तेजी परतली.

 हे ही वाचा :

Back to top button