पुणे : जलपर्णींनी वेढला कात्रज तलाव | पुढारी

पुणे : जलपर्णींनी वेढला कात्रज तलाव

धनकवडी : पुढारी वृत्तसेवा :  कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातील तलावात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जलपर्णी हटविण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय देशभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे. मात्र, जलपर्णीमुळे येथील सौंदर्याला बाधा येत आहे. कात्रज तलाव 29.5 एकरावर पसरलेला आहे. येथील जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेकडून हाय सिंथ हार्वेस्टर यंत्रामार्फत गतीने सुरू आहे. जलपर्णी जेसीबीच्या साह्याने डंपरऐवजी दोन ट्रॅक्टर व वीस मजुरांच्या साहाय्याने हटविण्यात येत आहे.

क्रेनच्या साह्याने तलावाच्या काठावरील जलपर्णी बाजूला करण्यात येत आहे. सुका असलेला 25% भाग पूर्णपणे जलपर्णीविरहित केला आहे. पाण्यातील सुमारे 50 टक्के भाग जलपर्णी काढून झाली आहे. मात्र, उर्वरित काम करण्यासाठी एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागण्याची शक्यता दिसत आहे. पावसाळ्यापूर्वी तलावातील जलपर्णी हटविणे आवश्यक आहे. नवीन निविदेचे काम एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे, असे संबंधित अधिकार्‍यांनी सांगितले.

महापालिकेतर्फे जलपर्णी हटविण्याचे काम सुरू असून, 30 मार्चपर्यंत हे काम पूर्ण होईल. हे काम 25 लाख रुपये खर्चाचे असून, आर्थिक वर्षात एप्रिलमध्ये नव्याने निविदा देऊन ते काम सुरू करण्यात येईल.
           – संतोष तांदळे, अधीक्षक अभियंता, मलनि:सारण विभाग, पुणे महापालिका.

जलचक्र धोक्यात
कात्रज तलावालगतच्या पद्मजा पार्क सोसायटी, लेकटाऊन सोसायटी, इंदिरानगर, सुखसागरनगर, कात्रज या परिसरातील नागरिकांना जलपर्णीमुळे दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलपर्णीमुळे तलावातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे मासे व पाण्यातील इतर जलचर जीव यांच्या आरोग्याला मारक ठरत आहे.

Back to top button