पुणे : मार्चअखेरपर्यंत कोरोना, एन्फ्ल्युएन्झा प्रबळ राहणार | पुढारी

पुणे : मार्चअखेरपर्यंत कोरोना, एन्फ्ल्युएन्झा प्रबळ राहणार

प्रज्ञा केळकर सिंग : 

पुढारी वृत्तसेवा : राज्यात एन्फ्ल्युएन्झा विषाणूचा एच3एन2, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या एक्सबीबी.1.16 या विषाणूंचा संसर्ग वाढत आहे. जानेवारी ते मार्च हा कालावधी विषाणूंच्या वाढीस पोषक मानला जातो. मार्चअखेरपर्यंत विषाणूंचा संघर्ष अर्थात ‘नैसर्गिक सी-सॉ’ सुरू राहणार आहे. उन्हाचा कडाका वाढल्यावर संसर्गाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज वैद्यकक्षेत्रातील जाणकारांनी वर्तविला आहे.
विषाणूंचा संघर्ष कायम सुरूच असतो. विशिष्ट परिस्थितीत एखादा विषाणू प्रबळ झाला की, दुस-याची परिणामकारकता कमी होते. सध्या एन्फ्ल्युएन्झाचा विषाणू प्रबळ झाला आहे. अशा परिस्थितीत घाबरून न जाता काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनावरील औषध आपल्याकडे उपलब्ध नाही. मात्र, एन्फ्ल्युएन्झावर टॅमी फ्लूसारखे गुणकारी औषध उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे आजीबाईंचा बटवाही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

चौथ्या डोसची आवश्यकता?
कोरोनाचा एक्सबीबी व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढत असताना लसीचे तिन्ही डोस घेतलेल्यांना केवळ फ्लूसदृश त्रास होऊ शकतो. अमेरिका अणि युरोपमध्ये चौथा डोस सुरू केला आहे. रुग्णसंख्या वाढल्यास ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांसाठी शासनाकडून चौथ्या डोसची शिफारस केली जाऊ शकते.

आर नॉट व्हॅल्यू म्हणजे काय?
विषाणूच्या संसर्गाचा वेग आर नॉट या पध्दतीने मोजला जातो. एका बाधित व्यक्तीकडून किती जणांना संसर्ग होऊ शकतो, याचा अंदाज यातून बांधला जातो. एक्सबीबी आणि एच3एन2 हे उपप्रकार नवीन असल्याने सध्या त्यांची आर नॉट व्हॅल्यू काढलेली नाही.

एच1एन1 ची आर नॉट व्हॅल्यू
राज्यात 2009 मध्ये स्वाईन फ्लूची साथ वेगाने पसरली. स्वाईन फ्लूस कारणीभूत असलेला एच1एन1 हा एन्फ्ल्युएन्झा ए विषाणूचा उपप्रकार आहे. या उपप्रकाराची आर नॉट व्हॅल्यू 1:2 इतकी होती. याचाच अर्थ एका बाधित व्यक्तीकडून 2 जणांना संसर्ग होऊ शकतो.

यापूर्वी 1968 मध्ये एच3एन2 विषाणूची लाट हाँगकाँग, भारत, युरोप आणि अमेरिका या देशांमध्ये येऊन गेली. त्यानंतर 1998-99 मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळाला. 2000 नंतर जन्माला आलेल्या मुलांमध्ये एच3एन2 विरोधात इम्युनिटी नसल्याने त्यांना संसर्ग जास्त होत आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले रुग्ण यांना लागण होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. एच3एन2 वरील परिणामकारक ठरणारी लस एप्रिल किंवा मेमध्ये येण्याची शक्यता आहे.
                                    – डॉ. अमित द्रविड, विषाणुजन्य आजारांचे तज्ज्ञ

एनआयव्ही-शासनाचा रुग्णसंख्येचा आकडा जुळेना
राज्यात इंफ्ल्यूएन्झा विषाणूच्या एच3एन2 उपप्रकाराचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. मात्र, राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) आणि राज्य शासनाच्या रुग्णसंख्येमध्ये तफावत दिसून येत आहे. एनआयव्हीच्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते मार्च या कालावधीत पुणे जिल्ह्यात एच3एन2 चे 428 रुग्ण नोंदवले गेले आहेत. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात 27 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एच3एन2 मुळे 3 संशयित रुग्णांचे मृत्यू झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. राज्यातील 69 प्रयोगशाळांमध्ये एच3एन2 साठी नमुन्यांची तपासणी होत आहे. तरीही, एनआयव्ही ही तपासणी आणि संशोधनासाठी असणारी महत्त्वाची संस्था आहे. आकड्यातील तफावत शोधून काढण्यासाठी आरोग्य संचालनालयाकडून एनआयव्हीकडील माहिती मागवून घेण्यात येणार आहे. एनआयव्हीकडे आलेले सर्व नमुने पुणे जिल्ह्यातील आहेत.

Back to top button