एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे गटनेते! विधिमंडळ सचिवालयाच्या परिपत्रकातील चूक आणि जयंत पाटील यांची टोलेबाजी | पुढारी

एकनाथ शिंदे राष्ट्रवादीचे गटनेते! विधिमंडळ सचिवालयाच्या परिपत्रकातील चूक आणि जयंत पाटील यांची टोलेबाजी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानपरिषदेतील गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे परिपत्रक विधिमंडळ सचिवालयाने काढले असून, विधिमंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरही तशी नोंद करण्यात आल्याची चूक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी सोमवारी विधानसभेच्या निदर्शनास आणून दिली. शिंदे यांनी शिवसेना पळवली आहे, आता आमच्याही पक्षाचे गटनेतेपदही त्यांनी बळकावले की काय? असा टोलाही त्यांनी लगावला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अशी चूक झाली असेल तर ती लगेच सुधारली जाईल, असे सांगितले.

विधीमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानपरिषदेचे गटनेते आणि प्रतोद हे पद रिक्त होते. या पदावर गटनेते म्हणून एकनाथ खडसे आणि पक्षप्रतोद म्हणून अनिकेत तटकरे यांची नियुक्ती करण्याबाबत राष्ट्रवादीने पत्र दिले होते. उपसभापती निलमताई गोऱ्हे यांनी तशी घोषणाही मागच्या आठवड्यात केली. याबाबतचे परिपत्रक काढताना मात्र विधिमंडळ सचिवालयाने गडबड केली.

एकनाथ खडसे यांच्याऐवजी एकनाथ शिंदे यांची राष्ट्रवादीचे गटनेते आणि अनिकेत तटकरे यांची पक्ष प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची अधिसूचना काढण्यात आली. जयंत पाटील यांनी विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर ही चूक सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. नागालँडमध्ये रीओ यांनी सर्व पक्षाचा पाठिंबा घेतला. आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही नवी पद्धत राज्यात सुरु केली आहे का? ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ पक्षाचे गटनेते होऊ इच्छित आहेत असे वाटते, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.

Back to top button