नाशिक चे नवविद्यापीठ! | पुढारी

नाशिक चे नवविद्यापीठ!

प्रताप जाधव

आतापर्यंत नाशिक हे राज्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या दोन विद्यापीठांसाठी प्रसिद्ध होते. परंतु, गेल्या आठवड्यात त्यात ‘भाई युनिव्हर्सिटी’ या नवीन विद्यापीठाची भर पडली. सध्या व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीची संकल्पना मूळ धरते आहे; पण नाशिक चे हे ताजे विद्यापीठ अधिक नावीन्यपूर्ण आहे. ती ‘व्हर्बल युनिव्हर्सिटी’ आहे. पारंपरिक विद्यापीठांचे काम प्रत्यक्षात, म्हणजे ऑफलाईन चालते. व्हर्च्युअल विद्यापीठांचे काम ऑनलाईन चालते. हे व्हर्बल विद्यापीठ मात्र प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कुठेच दिसत नाही. नाशिकचे पालकमंत्री व राज्याचे अन्न-नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या तोंडी त्याचा उल्लेख आल्याने त्याला ‘व्हर्बल’ म्हणायचे. राज्यातील दोन सत्ताधारी पक्षांचे जबाबदार नेतेच त्यावर बोलत असल्याने या विद्यापीठाचे कामकाज कुठेतरी चालत असावे, असा आपला कयास. तशीही सर्वसामान्यांची या विद्यापीठाशी संबंध येण्याची सुतराम शक्यता नाही; पण भुजबळ-कांदे वादाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांमधून का होईना या अनोख्या विद्यापीठाचा दूरपरिचय लोकांना झाला.

‘भाई युनिव्हर्सिटी’ हा या दोघांमधील वादनाट्याचा दुसरा अंक. या नाट्याचा पडदा उघडला तो नांदगाव येथील आढावा बैठकीत. आपल्या मतदारसंघावर निधी देण्यात अन्याय केला जात असून, मिळालेला निधीही भुजबळांच्या सान्निध्यातील ठेकेदारांना विकला जात आहे, असा थेट हल्‍ला कांदेंनी केला. मुळात निधी वाटपाचा अधिकार पालकमंत्र्यांना नसून जिल्हाधिकार्‍यांना आहे, असे सांगत कांदे यांनी व्यासपीठावर शेजारीच बसलेल्या भुजबळांना जाहीर आव्हान दिले. आमदार त्यांच्या घरच्या आखाड्यात असे दंड थोपटतील, याची कल्पना भुजबळांनीही केली नसेल; पण अनेक प्रकारच्या कुस्त्या खेळण्याचा अनुभव असल्याने त्यांनी कांदे यांना शांतपणे उत्तरे देत खडाखडी सुरू ठेवली. तेवढ्यापुरती कशीबशी वेळही मारून नेली. नंतर जिल्हा पातळीवरील आढावा बैठकीत दोघांमध्ये सौहार्दपूर्ण चर्चा झाल्याने समेट घडल्याचे चित्र निर्माण झाले. मात्र, काही दिवसांतच कांदे अधिक आक्रमक झाले. भुजबळांविरोधात उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी पाताळजगतातून धमकीचे फोन आल्याचा सनसनाटी आरोप करत पोलिस आयुक्‍तांकडे त्यांनी रीतसर तक्रारही दाखल केली. उपरोल्‍लेखित ‘भाई युनिव्हर्सिटी’ गाजली ती याच आरोपानंतर. भुजबळांनी ते ‘भाई युनिव्हर्सिटी’चे विद्यार्थी नसल्याचा टोला लगावला. तो अर्थातच कांदे यांना होता. त्यावर कांदे यांनी भुजबळांना या विद्यापीठाचे प्राचार्यपदच बहाल करून टाकले.

हा वाद आता टोकाला जाऊन पोहोचल्याचे दिसते. भुजबळांचा राजकारणातील अनुभव दांडगा असल्याने ते कांदे यांचा शांतपणे सामना करत आहेत. दुसरीकडे, कांदे दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. कांदे 20 षटकांच्या सामन्याप्रमाणे फलंदाजी करत आहेत, तर भुजबळांची खेळण्याची पद्धत कसोटी फलंदाजासारखी आहे.

भुजबळांचे पुत्र पंकज हे नांदगावचे दोनवेळा आमदार (2009 व 2014) राहिले आहेत. दुसर्‍या वेळी त्यांनी कांदे यांना पराभूत केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत कांदे यांनी त्या पराभवाचा वचपा काढला. या निवडणुकीची तयारी कांदे यांनी 2014 मध्ये लगेचच सुरू केली होती. आता यावेळीही त्यांनी 2024 ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवली असेल. ‘पळवलेल्या’ निधीच्या आकडेवारीसह ते आरोप करत आहेत. भुजबळ यांच्याकडून त्यांच्या बचावार्थ तपशील अद्याप तरी आलेला नाही. नांदगावच्या विकासासाठी आतापर्यंत विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या परीने प्रयत्न केला; पण लक्षणीय काम अभावानेच झाले असेल. आता निदान आपल्या हक्‍काच्या पैशांसाठी तरी आमदार थेट ताकदवान नेत्याला भिडतात म्हटल्यावर त्याचा काहीतरी परिणाम होणारच.

दुसरी चर्चा सुरू आहे ती, कांदे यांचा कोणी बोलविता धनी आहे का याची. कारण, भुजबळांची एकूणच ताकद पाहता त्यांच्याशी उघड वैर पत्करण्याआधी कोणीही चार वेळा विचार करील. तो करूनच, नव्हे तशी तयारीही करून कांदे मैदानात उतरलेले दिसतात. त्यातच त्यांच्या पाठीशी पक्षाचे (शिवसेना) शीर्ष नेतृत्व अप्रत्यक्षपणे आणि स्थानिक नेतृत्व प्रत्यक्षपणे उभे राहिल्याचेही दिसते. दुसरीकडे, भुजबळांच्या पत्रकार परिषदेवेळी आजूबाजूला त्यांचे निष्ठावंत यापलीकडे फारशी ओळख नसलेले नाशिक जिल्हा आणि शहर अध्यक्ष बसलेले होते. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे भुजबळांव्यतिरिक्‍त पाच आमदार आहेत. या पक्षाचे आणखीही वरिष्ठ नेते जिल्ह्यात आहेत. मात्र, या प्रकरणाकडे त्यांचा कानाडोळाच झालेला दिसतो. त्यामुळे हा वाद केवळ भुजबळ आणि कांदे यांच्यातलाच आहे की, कांदे यांच्याआडून आणखीही कोणाचे शरसंधान सुरू आहे, हा प्रश्‍न उरतोच.

Back to top button