निपाणीत महिलांकडून जबरी चोरी, सोन्यासह रोख रक्कम केली लंपास | पुढारी

निपाणीत महिलांकडून जबरी चोरी, सोन्यासह रोख रक्कम केली लंपास

निपाणी, पुढारी वृत्तसेवा : शहरात चोरट्यांनी उच्छाद मांडला असून सोमवारी (दि.३) भर दुपारी अशोकनगर मधील वर्दळीच्या ठिकाणी भामट्यांनी दोन दुकानदारांचे लक्ष विचलित करून ३१ हजारांची रोकड २.५ ग्रॅम सोन्याची कर्णफुले आणि दोन महागडे मोबाईल लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, भोजे कॉम्प्लेक्स येथील एका ब्युटिपार्लर आणि एका रेडीमेडकपड्यांच्या दुकानात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास लहान मुलगी, युवती आणि एका महिलेने खरेदीच्या बहाण्याने प्रवेश केला. सदर दुकानातील महिलांचे लक्ष विचलीत केले. प्रथम त्यांचा मोर्चा ब्युटीपार्लर येथे वळविला. या ठिकाणी त्यांनी ब्युटिशियनकडे कटिंग करणार असल्याचे सांगीतले. ब्युटिशियनने नकार दिल्यानंतर त्या दुकानातून त्या बाहेर निघाल्या. जाता-जाता सदर महिलांनी ब्युटिशियनचे १ हजार रोख रक्कम आणि सोन्याची अडीच ग्रॅम कर्णफुले असणारी पर्स लंपास केली.

त्यानंतर लगेचच त्यांनी त्याच्या शेजारी असणा-या दुकानाकडे आपला मोर्चा वळविला. दुपारी दुकान बंद करण्याची वेळ असल्याने महिला दुकान मालक दुकान बंद करण्याच्या घाईत असतांना तशातच गि-हाईक आल्याने त्यांनी आपल्याजवळील बॅगपर्स ज्यामध्ये तीस हजार रोख रक्कम आणि दोन महागडे मोबाईल संच होते. याच दरम्यान, दुकान मालकाची नजर चुकवित सदर बॅगपर्स घेवून पोबारा केला. सदर घटना लक्षात येताच दोन्ही दुकानदारांनी आरडा ओरडा केला. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. या घटनेची माहिती बसवेश्वर चौक पोलीसांना दिल्यावर पोलीस कर्मचारी एम. ए. तेरदाळ यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फूटजची तपासणी केली. सदर घटनेची नोंद करून तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button