बाळुमामा भंडारा यात्रा सुरळीत होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने सर्वोतोपरी सहकार्य करावे; प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांच्या सूचना | पुढारी

बाळुमामा भंडारा यात्रा सुरळीत होण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणेने सर्वोतोपरी सहकार्य करावे; प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांच्या सूचना

मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : आदमापूर ता. भुदरगड येथील सद्गुरू बाळूमामा यांच्या वार्षिक भंडारा यात्रा उत्सवास १२ मार्चपासून सुरूवात होत आहे. १९ ते २१ मार्चला मुख्य यात्रा दिवस असुन यावेळी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कालावधीत येणाऱ्या भाविकांना वेळेत ‘श्रीं’चे सुलभ दर्शन मिळावे, महाप्रसादाचा लाभ घेता यावा. पार्किंग समस्या उद्भवणार नाही, वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेऊन अशा पद्धतीने योग्य नियोजन करा. याकामी सर्व शासकीय यंत्रणेने सर्वोतोपरी सहकार्य करावे, अशा सक्त सूचना प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी केल्या.

आदमापूर (ता. भुदरगड) येथील मंदिर सभागृहात आयोजित नियोजन बैठकीत त्या बोलत होत्या. तहसीलदार अश्विनी आडसूळ, देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत यात्रेला होणारी गर्दी आणि नियंत्रण व्यवस्था, उपलब्ध सेवासुविधा, पोलिस यंत्रणा, रथ मिरवणूक, महाप्रसाद वाटप, पाणी पुरवठा, आरोग्याचा प्रश्न, अतिक्रमण, विक्रेते, बेशिस्त पार्किंगमुळे होणारे अडथळे आदी प्रश्नांवर चर्चा झाली. यानंतर प्रांताधिकारी वसुंधरा बारवे, तहसीलदार अश्विनी आडसूळ यांनी प्रत्यक्ष मंदिर परिसराची पाहणी करून माहिती घेत उपाययोजना सुचविल्या.

बाळूमामा देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले, सचिव रावसाहेब कोणकेरी, सरपंच विजय गुरव, व्यवस्थापक अशोक पाटील, दिनकरराव कांबळे, दत्तात्रय पाटील, यशवंत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कणसे , यांनी नियोजनाची माहिती देताना यात्रेदरम्यान येणाऱ्या विविध अडचणी सांगितल्या. यासाठी शासकीय यंत्रणेने सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी शासकीय अधिकारी, देवस्थानचे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, व्यापारी युवक उपस्थित होते.

Back to top button