इन्कम टॅक्स रिटर्न 2023-24 | पुढारी

इन्कम टॅक्स रिटर्न 2023-24

व्हीडीए शेड्यूलमध्ये द्यावी लागेल माहिती

आयटीआरसाठी जारी केलेले सर्वच फॉर्म म्हणजे फॉर्म-2, फॉर्म-3, फॉर्म-4, फॉर्म-5, फॉर्म-6 मध्ये व्हीडीए म्हणजे व्हर्च्युअल डिजिटल असेटस्पासून मिळणार्‍या उत्पन्नाची माहिती भरण्यासाठी व्हीडीए शेड्यूल नावाचा नवा कॉलम दिसेल. या कॉलममध्ये करदात्यांना डिजिटल असेटस् आणि त्यापासून मिळणार्‍या उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. व्हीडीए ट्रान्स्फर किंवा ट्रान्झेंक्शनची तारीख देखील सांगावी लागेल. व्हीडीएचा व्यवहार हा ‘ट्रान्झेक्शन गिफ्ट’नुसार झाला असेल, तर या गिफ्टवर भरलेल्या कराची माहिती द्यावी लागेल.

नव्या अर्जात काय आहे?

नव्या अर्जात व्हर्च्युअल डिजिटल असेट म्हणजे बिटक्वाईन आणि अन्य डिजिटल मालमत्तेची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 1 एप्रिल 2022 पासून व्हर्च्युअल डिजिटल असेटस्च्या व्यवहारातून मिळणार्‍या लाभांवर कर आकारला जाणार आहे. गेल्या वर्षी फायनान्स अ‍ॅक्टमध्ये नव्याने सामील केलेल्या या तरतुदीमुळे नव्याने कर आकारणी होणार आहे. येत्या एक जुलैपासून क्रिप्टो किंवा ‘नॉन फंगिबल टोकन’सारख्या डिजिटल मालमत्तेतून दहा हजारांपेक्षा अधिक व्यवहार झाल्या एक टक्का टीडीएस आकारला जाणार आहे. या व्यवहाराची माहिती प्राप्तिकर विवरणात द्यावी लागेल. शिवाय व्हर्च्युअल डिजिटल असेटस्पासून हेाणार्‍या कमाईची माहिती नव्या अर्जात द्यावी लागणार आहे.

शेअर ट्रेडिंगची माहिती देणे बंधनकारक

नव्या अर्जात शेअर ट्रेडिंगसंदर्भात नवा कॉलम जोडला आहे. या कॉलममध्ये शेअर बाजारात व्यवहार करणार्‍या मंडळींना माहिती सादर करावी लागेल. आतापर्यंत शेअर ट्रेडिंगमधला व्यवहार पूर्ण झाल्यानंतर या व्यवहाराला इंट्रा डे ट्रेडिंग आणि डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंगमध्ये विभागणी करत त्यावर करआकारणी व्हायची आणि तसे उल्लेख विवरणात केला जायचा. याची माहिती फॉर्म-3, फॉर्म-5 आणि फॉर्म-6 मध्ये दिली जात होती. आता ही सर्व माहिती वेगळ्या रूपात सादर करावी लागेल.

पोर्टलमध्ये नवीन कर व्यवस्था

प्राप्तिकराच्या पोर्टलमध्ये नवीन कर व्यवस्था ही आपोआप असेल. अर्थात, करदात्याने जुनी करव्यवस्था निवडली नसेल, तर त्यावर कर नव्या व्यवस्थेप्रमाणे आकारला जाईल. म्हणून कर व्यवस्था कोणतीही असो, कर भरताना योग्यरीतीने त्याचे आकलन करायला हवे.

सत्यजित दुर्वेकर

Back to top button