पिंपरी : डायनासोर गार्डनमध्ये दांडीबहाद्दारांचा टाईमपास | पुढारी

पिंपरी : डायनासोर गार्डनमध्ये दांडीबहाद्दारांचा टाईमपास

नवी सांगवी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान म्हणजेच डायनासोर गार्डन या नावाने ओळखले जाणार्‍या उद्यानात मुलींची छेड काढणार्‍या आणि टाईमपास करणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे कॉलेजच्या या दांडीबहाद्दर विद्यार्थ्यांवर सांगवी पोलिस ठाण्यातील दामिनी पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

नागरिकांच्या तक्रारींची दखल
दुपारी बारानंतर उद्यानात येणार्‍यांची संख्या कमी असते. याचा फायदा घेऊन दांडीबहाद्दर शाळा, महाविद्यालयातील मुले-मुली टाईमपास करण्यासाठी येत असतात. उद्यानात असणार्‍या राजवाडा तटबंदी महालाची प्रतिकृती साकारण्यात
आलेल्या ठिकाणी आडोशाला ही शाळंकरी मुले तासंतास टाईमपास करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.

उद्यानात ज्येष्ठांना मोफत प्रवेश
येथील उद्यानात वर्षभरापूर्वी पहाटे पाच ते सकाळी नऊ तसेच सायंकाळी चार ते आठ या वेळेत नागरिकांना मोफत प्रवेश दिला जात होता. सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत उद्यान बंद असायचे.

मात्र, गेल्या वर्षभरापासून पिंपळे गुरव येथील डायनासोर उद्यानात दुपारी 12 ते रात्री 8 या वेळेत महापालिकेकडून बारा वर्षांपर्यंत 10 रुपये त्यापुढील व्यक्तींना 20 रुपये तिकीट शुल्क आकारून नागरिकांना उद्यानात प्रवेश दिला जात आहे. ज्येष्ठांना मोफत प्रवेश दिला
जात आहे.

अनेक मुलांनी काढला पळ
गेली काही दिवस शाळा-कॉलेजमधील दांडीबहाद्दर मुला-मुलींचे दुपारी बारा ते सायंकाळी चार या वेळेत दिवसेंदिवस उद्यानात वापर वाढत चालला होता. अनेकदा फेरफटका मारण्यासाठी उद्यानात येत असलेल्या नागरिकांना लज्जास्पद दृश्य नजरेस पडत आहे. अशा प्रकारे उद्यानात हा प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याने येथे येणार्‍या नागरिकांनी शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास पोलिस कंट्रोलला संपर्क करून कळविले.

त्यानंतर काही वेळातच सांगवी पोलिस ठाण्यातील दामिनी पथकाच्या सुनीता जाधव, धरती वाडेकर येथील उद्यानात दाखल झाल्या. या वेळी चाळे करणार्‍या शाळकरी मुलींना-मुलांना पकडून समज देऊन सोडून देण्यात आले. या वेळी इतरत्र बसलेल्या मुला-मुलींनी प्रसंगावधान ओळखून तिथून त्वरित पळ काढल्याचे पहावयास मिळाले.

कंट्रोलकडून माहिती मिळताच आम्ही याठिकाणी त्वरित आलो. उद्यानात शाळकरी मुले-मुली टाईमपास करत असल्याचे दिसून आले. या वेळी मुलांना पकडून समज देऊन सोडून देण्यात आले. इतर ठिकाणी बसलेल्या मुला-मुलींनी आम्हाला पाहून पळ काढला. येथे येणार्‍या शाळंकरी मुला-मुलींना याआधी दोन-तीन वेळा हटकले होते.
                                             – सुनीता जाधव, महिला पोलिस दामिनी पथक

Back to top button