मंचर : कृषिपंपांचे वीजजोड तोडणार्‍यांवर गुन्हा दाखल करा | पुढारी

मंचर : कृषिपंपांचे वीजजोड तोडणार्‍यांवर गुन्हा दाखल करा

मंचर(आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करू नये, असा उच्च न्यायालय व अन्न सुरक्षा आयोगाचा आदेश आहे. त्याचा अवमान करून पिंपळगाव खडकी येथील कृषिपंपाचे वीज कनेक्शन बेकायदा खंडित करणार्‍या महावितरणाच्या अधिकार्‍यांवर मंचर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवदन मंचर पोलिस ठाण्याला देण्यात आले आहे.

या निवेदनात आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी म्हटले आहे, की पिंपळगाव तर्फे महाळुंगे येथील कृषिपंपाचे वीज कनेक्शन बेकायदा तोडण्यात आले आहे. उच्च न्यायालय, अन्न सुरक्षा आयोगाने दिलेल्या आदेशाचा महावितरणचे येथील उपकार्यकारी अभियंता, निरगुडसर येथील कनिष्ठ अभियंता आणि जनमित्र यांनी अवमान केला आहे.

मुख्यमंत्री यांनी याअगोदरच महावितरण कंपनीस कृषिपंपाचे वीज कनेक्शन कट करू नये, असे सांगितले असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. त्यामुळे संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. बांगर यांनी सदर निवेदन तहसीलदार ,महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांनाही दिले आहे. कृषिपंपाचा वीजपुरवठा पूर्ववत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा बांगर यांनी दिला आहे.

Back to top button