पुणे : आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसला विस्तारण्याची संधी | पुढारी

पुणे : आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसला विस्तारण्याची संधी

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : रवींद्र धंगेकर यांच्या कसबा पेठेतील विजयामुळे काँग्रेसला मोठे बळ मिळाले. त्यांच्या विजयात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या कार्यकर्त्यांचाही मोठा वाटा आहे. आघाडीकडून आगामी निवडणुकांना लढताना काँग्रेसलाही विस्तारण्याची संधी मिळणार आहे. पुण्यात सत्ता गाजविणारी काँग्रेस 2007 पासून आक्रसत गेली. महापालिकेतील सत्ता त्यांच्या हातातून 2007 मध्ये निसटली. सुरेश कलमाडी 2009 मध्ये खासदार, तर विनायक निम्हण आणि रमेश बागवे आमदार झाले. मात्र, 2014 पासून त्यांचे विधानसभेत प्रतिनिधित्वच नव्हते. महापालिकेतही जेमतेम दहा नगरसेवक निवडून आले. अशी स्थिती असताना धंगेकरांचा विजय हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविणारा ठरला आहे.

पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धंगेकरांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेताना पुण्यात येऊन ठाण मांडले. ते मतदारसंघात फिरू लागले. स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्यातील मतभेद मिटविले. प्रदेशातील अनेक नेत्यांना त्यांनी प्रचारासाठी बोलाविले. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनाही त्यांनी प्रचाराला बोलाविले. आघाडीतील वरिष्ठ नेते प्रचारात उतरल्याने कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले. कसबा पेठेतील विजय हा आघाडीला केवळ पुण्यात नव्हे, तर राज्यातही फायदेशीर ठरला असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढायचे होते. मात्र, कसबा पेठेतील निकाल हा आघाडीच्या बाजूने कौल देणारा ठरला. कसबा पेठ आणि लगतच्या पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँग्रेसचे दहापैकी सात नगरसेवक आहेत. या नगरसेवकांसोबत आघाडीतील तीन नगरसेवक आहेत. त्यामुळे या दहा जणांसोबत आणखी काही जागा जिंकण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील भाजपच्या नगरसेवकांचे काम असमाधानकारक असल्याचा निष्कर्षच कसबा पेठेच्या निकालातून स्पष्ट झाल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

काँग्रेसला पुण्यातील सध्याचे नेते आणि कार्यकर्ते यांना एकत्रित करून संघटनाबांधणीबरोबरच नव्या कार्यकर्त्यांना जोडण्याची गरज आहे. स्थानिक नेत्यांतील मतभेद मध्यंतरी उफाळून आले होते. निवडणुकीच्या काळात सर्वच जण प्रचारात सहभागी झाले होते. या बदललेल्या पक्षातील वातावरणाचा पाठपुरावा करताना महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेसने लागण्याची आवश्यकता आहे.

इच्छुक उमेदवारांना ताकद देण्याची गरज
कसबा पेठेतील निकालाने मिळालेले बळ लक्षात घेत काँग्रेसने संघटना वाढविण्यासाठी हालचाली वाढविल्या पाहिजेत. त्यामध्ये नव्या कार्यकर्त्यांवर आणखी जबाबदारी सोपविल्यास संघटनेची ताकद वाढेल. विस्तार करताना आघाडीतील पक्षाचे स्थानिक नेते लक्षात घेत महापालिका निवडणुकीच्या इच्छुकांमधील उमेदवारांची नावे निश्चित करून त्यांना ताकद दिल्यास महापालिकेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांवरही आत्तापासूनच तयारी सुरू केल्यास काँग्रेसला पुण्यात पुन्हा विस्तारण्याची संधी मिळणार आहे.

Back to top button