गोंडवाना विद्यापीठ : गडचिरोली केंद्राच्या बांधकाम मंजूरीसाठी मुनगंटीवार यांचे साकडे | पुढारी

गोंडवाना विद्यापीठ : गडचिरोली केंद्राच्या बांधकाम मंजूरीसाठी मुनगंटीवार यांचे साकडे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार असून या विद्यापीठाच्या गडचिरोली केंद्राच्या इमारतीचे बांधकाम वेगाने होणे आवश्यक आहे. यासाठी बांधकाम निधीचे अंदाजपत्रक त्वरित मंजुर व्हावे. याकरीता चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुलपती व राज्यपाल रमेश बैंस यांच्याकडे साकडे घातले आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. दोन्ही जिल्ह्यांत वनक्षेत्रही जास्त आहे. त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार क्षमता वाढविणारे शिक्षणक्रम व कौशल्य विकास प्रशिक्षण उपलब्ध करणे, ही गोंडवाना विद्यापीठाची उद्दीष्टे आहेत. सध्या गडचिरोली येथील विद्यापीठ केंद्र भाडेतत्वावरील इमारतीत आहे. या विद्यापीठावर चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील तरूणांचे भवितव्य अवलंबून असल्याने विद्यापीठ स्वतःच्या इमारतीत लवकरात लवकर स्थलांतरित होणे आवश्यक आहे. विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली केंद्राच्या बांधकामासाठी 884 कोटींचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे. या अंदाजपत्रकास मान्यता मिळाल्यानंतर निधीविषयक प्रक्रिया पुढे सरकेल. त्यामुळे हे अंदाजपत्रक मंजुर करण्याकरीता राज्यपालांनी कुलपती या नात्याने त्वरित लक्ष द्यावे, अशी विनंती मुनगंटीवार यांनी राज्यपाल बैंस यांना केली आहे. शिवाय राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

हेही वाचा : 

Back to top button