कांदा निर्यातीवर कुठलेही निर्बंध, बंदी नाही; केंद्र सरकारची स्पष्टोक्ती | पुढारी

कांदा निर्यातीवर कुठलेही निर्बंध, बंदी नाही; केंद्र सरकारची स्पष्टोक्ती

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कांद्याचे भाव गडगडल्याने देशातील शेतकरी चिंतेत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. पंरतु, कांद्याच्या निर्यातीवर कुठलेही निर्बंध अथवा बंदी घालण्यात आलेली नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. कांद्याचे सध्याचे निर्यात धोरण ‘मुक्त’आहे. केवळ कांदा बियाणांची निर्यात ‘प्रतिबंधित’ आहे. विदेशी व्यापार महासंचालकांच्या अधिकृत परवानगीनुसार हा प्रतिबंध घालण्यात आल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिली आहे.

विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात एप्रिल ते डिसेंबर २०२२ या काळात ५२३.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर किमतीच्या कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. या निर्यातीत २०२१ च्या तुलनेत १६.०३ टक्क्यांची वाढ झाल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. डिसेंबर महिन्यात सर्वाधिक ५२.१ दशलक्ष अमेरिकी डॉलर किमतीच्या कांद्याची निर्यात करण्यात आली होती.

विदेशी व्यापार महासंचालकांच्या अधिसूचनेनूसार सुधारित कांद्याचे सर्व जातीचे कापलेले, भाग केलेले किंवा पावडर स्वरुपात शिवाय बंगलोर गुलाब कांदे आणि कृष्णपुरम कांदे वगळून पावडर स्वरुपात, कापलेले, चिरलेले अथवा पावडर स्वरुपातील कांदे प्रतिबंधीत श्रेणीतून मुक्त श्रेणीत समाविष्ट करण्यात आल्याचे देखील मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. असे असले तरी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकरी संघटनांकडून करण्यात आलेली कांदा विक्रीवर अनुदान अथवा हमीभाव देण्यासंबंधीच्या मागणीवर अद्याप कुठलाही निर्णय केंद्राकडून घेण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button