शेवगाव : विद्यार्थ्यांची नाशिक आयुक्तांकडे मध्यरात्री आगेकूच | पुढारी

शेवगाव : विद्यार्थ्यांची नाशिक आयुक्तांकडे मध्यरात्री आगेकूच

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : प्रवरा मेडिकल ट्रस्ट संचलीत इंग्लिश मेडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेजच्या अकरावीतील 100 विद्यार्थ्यांनी शुक्रवारी मध्यरात्री अचानक वसतीगृहातून नाशिक आयुक्त कार्यालयाकडे पायी आगेकूच केली. यामुळे शाळेच्या प्रशानांमध्ये एकच खळबळ उडाली. आपल्याला सुविधा मिळत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांच्या या पावित्र्याने रात्री उशीरा पोलिस, आदिवाशी प्रकल्प अधिकारी, सामाजीक कार्यकत्यांनी समजूत काढल्याने विद्यार्थी पहाटे पुन्हा वसतीगृहात परतले.

शासनाच्या आदेशाने इंग्रजी माध्यमांत शिक्षण मिळण्यासाठी वेगवेगळ्या शाळेत निवडलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील जवळपास 150 विद्यार्थी व विद्यार्थींनी शेवगावमधील इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचा शिक्षणासह वसतीगृह, जेवण, चहा, नाष्टा, कपडे, बुट, असा सर्व सुविधांचा खर्च शासन करते. मात्र, कोणतीच सुविधा विद्यालयाकडून पुरवली जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणने आहे.

आदिवासी प्रकल्प विभागाच्या अधिकार्‍यांकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ठींसाठी संघर्ष करावा लागतो. यामुळे शुक्रवारी (ता.25) रात्री अचानक एकत्र येत त्यांनी नाशिकच्या आदिवासी आयुक्तांकडे पायी मोर्चाने जाण्याचा निर्णय घेतला होता. तसा मोर्चाही काढला होता. मात्र, ही माहिती मिळताच पोलिस व वंचित बहुजनचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी शेवगाव शहरापासून तीन किमी अंतरावर नेवासा रस्त्यावर विद्यार्थ्यांना अडवले. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर त्यांची समजूत काढली आणि त्यांना मगंल कार्यालयात आणण्यात आले. प्रा. चव्हाण यांनी आदिवासी प्रकल्प विभागाच्या अधिकार्‍यांशी भ्रमनध्वनीवरून संपर्क केल्याने तेही रातोरात उपस्थित झाले.

आज सकाळी प्रा. किसन चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे पंजाबराव आहेर, अभिमत विद्यापीठाचे नकुल तांबे, प्राचार्य एस. आर. प्रधान आदींच्या उपस्थित झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या कथन केल्या. या समस्यांचे आठ दिवसात निराकरण न झाल्यास विद्यार्थ्यांसह नाशिक आयुक्त कार्यालयाकडे पायी जावून जाब विचारण्यात येईल. तसेच, संस्थेची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जाईल, असा इशारा प्रा.किसन चव्हाण यांनी दिला.

विद्यार्थ्यांच्या या आहेत तक्रारी
विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने बाथरूमध्ये पाणी प्यावे लागते, स्वच्छता व शौचालयांची दुरावस्था झाली आहे. वस्तीगृहात अथवा इतरत्र एका खोलीमध्ये सुमारे 15 विद्यार्थ्यांना आहेत. पाचवीपर्यंतच्या लहान मुले-मुली एकत्र असतात, अशा तक्रारी केल्या आहेत. तसेच, शिकवतांना आदिवासी विद्यार्थ्यांचा वर्ग वेगळला भरवला जातो. काही शिक्षकांकडून मुलांना त्रास दिला जातो. अडचणींबाबत बोलू दिले जात नाही, विद्यार्थ्यांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न होतो. लहान मुलांना धाकात ठेवले जाते. असा दुजाभाव केला जात असल्याच्या विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या आहेत.

पोलिस, आदिवाशी प्रकल्प अधिकारी, सामाजीक कार्यकत्यांनी काढली समजूत
विद्यार्थी पहाटे परतले पुन्हा वसतीगृहात
शहरापासून तीन किमी अंतरावर विद्यार्थ्यांना अडवले

पहिली ते दहावीच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना बसू दिले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी गोंधळ घालून कँम्पस सोडून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास दिलेला नाही.
                                               – एस. आर. प्रधान,
                   प्राचार्य इंग्लिश मीडियम स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलज, शेवगाव

शेवगाव येथे घडलेल्या प्रकाराबाबत आमच्या विभागाच्या अधिकार्‍यांनी विद्यार्थ्यांची समक्ष भेट घेतली. त्यांच्या तक्रार व म्हणणे ऐकून घेतले. त्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या सूचना संबंधीत संस्थेला देण्यात आल्या आहेत.
                                             – संदीप गोलाईत, अपर आयुक्त,
                                               आदिवासी विभाग, नाशिक

Back to top button