पुणे : विमानतळावर वैद्यकीय सुविधांची वानवा | पुढारी

पुणे : विमानतळावर वैद्यकीय सुविधांची वानवा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  प्रवाशांच्या संख्येत आणि उत्पन्नात देशात दहाव्या क्रमांकावर असलेल्या पुणे विमानतळावर आपत्कालीन अथवा तातडीच्या वैद्यकीय सुविधाच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एखाद्या विमान प्रवाशाला येथे अस्वस्थ वाटू लागल्यास तातडीची आपत्कालीन वैद्यकीय सुविधा कशी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे विमानतळावरून दररोज 180 ते 190 विमानांची उड्डाणे होतात. त्याद्वारे 30 हजारांपेक्षा अधिक प्रवासी येथून प्रवास करतात. त्यातील अनेक प्रवाशांना काही ना काही मोठे आजार असतात. त्यांना विमानतळावरून प्रवास करताना जर अचानक त्रास होऊ लागला, तर आपत्कालीन वैद्यकीय सुविधा मिळण्याच्या दृष्टीने काही नियोजन नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पुणे विमानतळाने या सुविधा तातडीने येथे उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

सध्या फक्त याच सुविधा…
पुणे विमानतळावर तत्काळ उपचार होण्यासाठी मोठी वैद्यकीय सुविधा असणे गरजेचे आहे. विमानतळावर फक्त प्रथमोपचाराची सुविधा असून, एक साधी रुग्णवाहिका आहे. एवढ्या मोठ्या विमानतळावर किमान एक कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स असणे गरजेचे आहे. त्यासोबतच तातडीची वैद्यकीय सुविधाही आवश्यक आहे. मात्र, विमानतळावर अशी सुविधा नसल्याने आपत्कालीन परिस्थितीतील उपचार कसे होणार? असा प्रश्न आहे.

या सुविधांबाबत तातडीने निर्णय व्हावा
1) पुणे विमानतळावरील वैद्यकीय केंद्र पूर्णपणे आपत्कालीन/तातडीच्या वैद्यकीय सुविधांनी व प्रशिक्षित मनुष्यबळाने सुसज्ज करण्यात यावे. विशेषत: ’गोल्डन अवर’ उपचार केंद्रस्थानी ठेवून या सुविधा निर्माण करण्यात याव्यात.
2) विमानतळावर कार्डियाक केअर रुग्णवाहिका तैनात करण्यात यावी.
3) विमानतळावर मोफत वैद्यकीय सुविधेच्या उपलब्धतेची माहिती आणि संपर्क क्रमांक, निर्गमन आणि आगमन दोन्ही ठिकाणी ठळकपणे फलकाद्वारे प्रदर्शित करण्यात यावेत.
4) विमानतळ वैद्यकीय केंद्राचा स्वतःचा स्वतंत्र थेट संपर्क/आणीबाणी क्रमांक असावा, जो ठळकपणे प्रदर्शित करण्यात यावा. (सध्या येथे फक्त विस्तार क्रमांक असल्याचे सांगण्यात आले.)
5) किमान एक-एक एईडी (ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिबि—लेटर) उपकरण, निर्गमन आणि आगमन दोन्ही भागांत उपलब्ध करण्यात यावे.
6) विमानतळ वैद्यकीय केंद्र चालविण्यासाठी विमानतळापासून 8 कि. मी. अंतरावर असलेल्या एखाद्या सुसज्ज हॉस्पिटलबरोबर व्यवस्था करण्यात यावी.

पुणे विमानतळाला अलीकडेच मी आरोग्य केंद्राला भेट दिली. त्या वेळी मला येथे आपत्कालीन वैद्यकीय सेवा नसल्याचे दिसले. येथे फक्त प्रथमोपचाराची सुविधा आहे. कोणी प्रवासी अत्यवस्थ झाल्यास त्याला रुग्णालयात घेऊन जावे लागते. तोपर्यंत रुग्णाचे काही झाल्यास, याला कोण जबाबदार राहणार? त्यामुळे एपीडी, पुणे विमानतळ, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष यांना पुणे विमानतळावर आपत्कालीन/ तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
                                                        – धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूकतज्ज्ञ

Back to top button