कामशेत येथे ताब्यात घेतलेली वाहने जळून खाक | पुढारी

कामशेत येथे ताब्यात घेतलेली वाहने जळून खाक

कामशेत : कामशेत पोलिस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस अनेक महिन्यांपासून अस्ताव्यस्त उभी असलेल्या वाहनांना अचानक आग लागली. यात अनेक वाहने जळून खाक झाली. अनेक महिन्यांपासून ही वाहने उभी होती. अशा पोलिस कोठडीतील वाहनांना सोमवार (ता.20) रोजी रात्री पावणेनऊ ते नऊच्यादरम्यान आग लागली. आग लागल्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

पोलिस कोठडीतील वाहनांना लागलेली ही आग मोठ्या प्रमाणात असल्याने भले मोठे आगीचे लोळ पसरले होते. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या लागलेल्या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. ही आग सेवा रस्त्यालगत असलेल्या या वाहनांना लागल्याने मोठ्या प्रमाणावर परिसरात बघ्यांची गर्दी जमा झाली होती. सेवा रस्ता बंद करण्यात आला.

पोलिसांनी या वेळी नागरिकांनी पुढे येऊ नये, असे वारंवार सांगूनही बघ्यांची गर्दी काही मागे हटत नव्हती. त्यामुळे पोलिसांना बघ्यांवर या वेळी काठी उगारावी लागली. तर, काही पोलिसांनी प्रसार माध्यमांच्या पत्रकारांचा मोबाईल देखील ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस कोठडीतील ही वाहने मागील अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणी उभी आहेत. त्या वाहनांमध्ये इंधन असल्याने अज्ञात कारणाने आग लागली.

या वाहनांमधील इंधनाच्या टाक्या पेठ घेऊन फुटत होत्या. त्यामुळे परिसर या स्फ ोटांच्या आवाजाने दणाणून निघाला होता. शिवाय बाजूला गॅरेज असल्याने जे टायर रस्त्यावर होते ते टायर पण फुटले. रात्री पावणेदहा वाजता लोणावळा येथून आयआरबीच्या व तळेगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या वाहनाने आग आटोक्यात आटोक्यात आणली.

Back to top button