तुम्ही कधी दोन डोके असलेले जुळे सरडे पाहिले आहे का? | पुढारी

तुम्ही कधी दोन डोके असलेले जुळे सरडे पाहिले आहे का?

लंडन : दोन डोकी असलेले साप, कासव किंवा अन्यही काही प्राणी पाहायला मिळत असतात. एकमेकांच्या शरीरात दोन भ्रूण वाढले की असा प्रकार होत असतो. काही वेळा दोन भ—ूण वाढीच्या प्रक्रियेवेळी एकमेकांना चिकटतात व त्यांचे काही अवयव एकमेकांच्या शरीरातच वाढतात. असे ‘सयामी जुळे’ माणसापासून अन्य प्राण्यांपर्यंत अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. आता एका अशाच सरड्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या सरड्याला केवळ दोन डोकी आहेत असे नाही. वास्तवात दोन सरडे एकमेकांना कंबरेखालील भागात जुळलेले आहेत असेच या व्हिडीओतून दिसून येते. एकंदरीतच हे ‘सयामी जुळे’ म्हणता येईल असे सरडे आहेत! या दोन सरड्यांचे डोके, छाती व पोटाचा भाग वेगवेगळा असून कंबरेखालील भागात ते एकमेकांशी जुळलेले आहेत.

अर्थातच दोघांची शेपटी एकच आहे. मात्र, पुढील दोन पाय वेगवेगळे आहेत व मागील दोन पाय ‘कॉमन’ आहेत. त्यांना सांभाळणार्‍या व्यक्तीने त्यांचा हा व्हिडीओ बनवला आहे. त्याने या सरड्यांना प्लेटमध्ये बसवून त्यामध्ये काही जिवंत किडे सोडले आहेत. हे सरडे आपापल्या तोंडांनी हे किडे पकडून त्यांचा चट्टामट्टा करीत असताना व्हिडीओत दिसते. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ही ‘पॉलीसेफली’ नावाची स्थिती आहे असे त्याच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. हा व्हिडीओ अर्थातच व्हायरल झाला असून अनेक लोक त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

Back to top button