लंडनच्या संसद चौकात ‘जय शिवराय’चा गजर | पुढारी

लंडनच्या संसद चौकात ‘जय शिवराय’चा गजर

निघोज : पुढारी वृत्तसेवा :  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आली. लंडन येथे शिक्षणासाठी गेलेल्या संग्राम शेवाळे यांनी लंडनच्या संसद चौकात भारतीय विद्यार्थी व अन्य देशातील विद्यार्थ्यांसमवेत शिवजयंती मोठ्या उत्साहात आयोजित केली. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या ‘जय शिवराय’च्या घोषणांनी संसद चौक परिसर दणाणून सोडले. संग्राम शेवाळे पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील असून, सहा महिन्यांपूर्वी लंडन येथे उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगात परिचित आहे. आपल्या युद्धकला आणि सर्व समावेशक प्रशासकीय नैपुण्यांमुळे शिवाजी महाराज आदर्श राजे ठरले.

लंडन शहरात भारतीय संस्कृती जोपासत अनेक राज्यातील विद्यार्थी संग्राम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मानवंदना देण्यासाठी एकत्रित आले होते.

‘महाराष्ट्राची परंपरा जोपासली’
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अनेक देशातील अभ्यासक भारतात येतात आणि हीच महाराष्ट्राची परंपरा जोपासत शिवाजी महाराजांना लंडनच्या संसद चौकात वंदन केले, असे अ‍ॅड. संग्राम शेवाळे यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

Back to top button