Maharashtra Political Crisis : फिनीक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेऊ -संजय राऊत | पुढारी

Maharashtra Political Crisis : फिनीक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेऊ -संजय राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यातील पक्षचिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह देण्यात आले आहे. तसेच ‘शिवसेना’ हे नाव देखील शिंदे गटाला देण्यात आले असल्याने ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यावर खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलत असताना म्हणाले की,”एक पक्ष ५० वर्षांपासून उभा आहे, घटनेनुसार चालत आला आहे. त्या पक्षातील काही आमदार आणि खासदार आमिषाला बळी पडून बाहेर गेले म्हणून तो पक्ष, चिन्ह त्यांच्या मालकीचा कसा काय होऊ शकतो? हा प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ या लोकशाहीमध्ये आली आहे.” त्याचबरोबर ते असेही म्हणाले की,” आम्ही फिनीक्स पक्षाप्रमाणे पुन्हा झेप घेऊ”.वाचा सविस्तर बातमी. (Maharashtra Political Crisis)

Maharashtra Political Crisis : शिवसेना जिथल्या तिथे आहे

माध्यमांशी बोलत असताना खासदार संजय राऊत म्हणाले की,”कोकणात शिवसेना जिथल्या तिथे आहे. काल संध्याकाळी निकाल लागला आणि निवडणूक आयोगाने  परस्पर ठरवलं की शिवसेनेची मालकी कोणाकडे द्यायची. म्हणून ताबडतोब कोकणात जसं की सिंद्धुदुर्ग असो वा कणकवली लगेच त्या बाजूला गेले अस काही नाही. सकाळी वृतपत्रात फोटो पाहिले, म्हणे जल्लोष आणि फोटोत मोजून सात चेहरे होते आणि त्याच्यात  एक अब्दुला नाचत होता.  बेगाने की शादी में अब्दुल्ला दीवाना. पण ते आधीच शिवसेना सोडून गेलेले आहेत. आणि काल ते फटाके वाजवत होते. असे अब्दुला घेऊन तुमची शिवसेना वाढणार आहे का?” असं म्हणत त्यांनी राणे यांच्यावर निशाणा साधला आहे.

निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ

समाजमाध्यमांवर लोकांनी चांगल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्यामध्ये एका म्हणीचा उल्लेख आहे,”पाळीव कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणून मालक हा भिकारी होत नाही आणि कुत्रा मालक होत नाही. शिवसेना ही शिवसेना आहे. तुम्ही कितीही अश्या पाट्या पुसण्याचा प्रयत्न केला तरी रावणाला काही धनुष्यबाण छाताडावर पेलवणार नाही तर त्याच्या छातीवरचं पडणार आहे. पण देशातील सर्व विरोधीपक्षातील विरोधकांनी एकत्र येऊन निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली  आहे, “राजकीय पक्ष म्हणजे कय?” तुमची व्याख्या काय आहे राजकीय पक्षाची?  एक पक्ष ५० वर्षांपासून उभा आहे, घटनेनुसार चालत आला आहे. त्या पक्षातील काही आमदार आणि खासदार आमिषाला बळी पडून बाहेर गेले म्हणून तो पक्ष, चिन्ह त्यांच्या मालकीचा कसा काय होऊ शकतो? हे प्रश्न सर्वांनी विचारण्याची वेळ या लोकशाहीमध्ये आली आहे.

कायदा, लोकभावना पायदळी 

मुळात तुम्ही त्या खुर्चीवर बसला आहात. म्हणून तुम्हाला सर्व काही, घटना, कायदा, नियम कळतं असं नाही, उलट तुम्ही लोकभावना, कायदा पायदळी तुडवून निर्णय घेतला आहात. कायदा आम्हालाही कळतो. आम्ही वीस-एक वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून आहोत. लॉ मेकर्स आहोत. कायदेमंडळात जातो. कायद्याची, घटनेची पुस्तकं वाचली आहेत. अभ्यास केला आहे. या देशातील जनता मुर्ख आहे का? तुम्ही खुर्चीवर बसला आहात असं नाही तर तुम्हाला बसवंल आहे. दोन दिवस ही अतिशबाजी, फटाके होतील. यासाठी काही खोक्यांचं बजेट आधीच ठरवलं असेल. हल्ली खोक्यांच्या हिशोबानेच सर्व व्यवहार सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर अडीच महिन्यात दोन-अडीच कोटींच्या जेवणावळी उठतात. तर फटाकेवरही पाच-पंचवीस कोटी सरकारच्या तिजोरीतून खर्च करतील. असं म्हणतं राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

Maharashtra Political Crisis : लोकांच्या भावना आमच्यासोबत आहेत

राऊत पुढे बोलताना असेही म्हणाले की,” काल उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे की, या निर्णयाने आम्ही अजिबात निराश नाही, वेदना तर होणारच पण आम्ही अजिबात खचलेलो नाही. आम्ही आता सर्वोच्च न्यायालयाकडे जाणार आहे. मुळात पक्ष हा जागेवरचं आहे. तो कुठेही गेलेला नाही. लोकांच्या भावना आमच्यासोबत आहेत. ज्या लोकांच्या खिश्यात आणि घश्यात हा पक्ष घालण्याचा  प्रयत्न केला गेला त्यांना ठसका लागल्याशिवाय राहणार नाही. हे कणकवलीत बसून सांगतो.”

कोकणात शिवसेना जागच्या जागी आहे

आमच्यासोबत सर्व आहेत. आमदार खासदार आम्ही सर्व एकत्र आहोत. पण जे गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत. त्यांना भले चिन्ह आणि पक्ष मिळो. ते कोणत्याही सभागृहात दिसणार नाहीत. कालच्या निर्णयाने संतापाची लाट जनतेत आहे. देशात राजकीय हिंसाचार सुरु आहे. आणि जनता हे कदापी सहन करणार नाही. तुम्ही जर आता निवडणुका घेतल्या तर कळेल की शिवसेना कोणाची आहे. तुमच्यात हिंमत नव्हती निवडणुका घेण्याची म्हणून तुम्ही निवडणूक आयोगाचा गळा दाबून त्यांना निर्णय घ्यायला भाग पाडलं. सर्वोच्च न्यायालयात काय होईल हे येणारा काळ ठरवेल. पण तुम्ही निवडणूक घ्या आणि जनतेला फैसला करु द्या की शिवसेना कोणाची ते. असं  बोलत राऊत यांनी शिंदे गटाला निवडणुकीचं आवाहन केले आहे.

ही लढाई शिवसेना अणि मिंधे गट अशी नाही तर ती शिवसेना आणि मिंधे गटापाठीमागे असलेली छुपी सत्ता आहे त्यांची आहे. ती कायम राहील. सुडाचं राजकारण सुरु आहे. आपल्याला हवी असलेली कळसुत्री बाहुली ठेवून आपल्याला हवे असेलेले निर्णय घेतले जात आहेत. ही कसली लोकशाही आहे. लोकशाही शिलल्क राहिलेली नाही जरी हा काल निर्णय झाला असला तरी, ज्या प्रमाणे फिनिक्स पक्ष भरारी घेतो तशी आम्ही भरारी घेऊ.

शिवसेनेची लाखोची संपत्ती म्हणजे हजारो शिवसैनिक

उद्धव ठाकरे हेच शिवसेना प्रमुख आहेत आणि तेच राहतील. शिंदे गट त्यांनी त्यांचं पहावं स्वत:ला जनरल, ब्रिगेडर म्हणून घ्यावं. शिवसेना आणि शिवसैनिक आहे तेच राहील. शिवसेना भवन, पक्ष आमचाच आहे. शिवसेनेची लाखोची संपत्ती म्हणजे हजारो शिवसैनिक ते आमच्यासोबत राहतील.

हेही वाचा

Back to top button