पुणे: ‘स्मार्ट’च्या प्रकल्प संचालकांच्या वागणुकीचा निषेध, घटनेविरोधात कृषी विभागाचे अधिकारी आक्रमक | पुढारी

पुणे: ‘स्मार्ट’च्या प्रकल्प संचालकांच्या वागणुकीचा निषेध, घटनेविरोधात कृषी विभागाचे अधिकारी आक्रमक

पुणे, पुढारी वृत्तसेवा: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचे (स्मार्ट) संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडून बैठकीमध्ये कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) संचालक दशरथ तांभाळे यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा कृषि सेवा महासंघाने तीव्र शब्दात निषेध नोंदवित शुक्रवारी कार्यालयात काळ्या फिती लावून काम केले.

साखर संकुल येथील आवारात शुक्रवारी (दि.17) सकाळी संघटनेच्या सभासद अधिकार्‍यांनी एकत्र येत आक्रमक भुमिका घेतली आणि झालेल्या प्रकाराचा धिक्कार करीत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी कृषी विभागाचे फलोत्पादन संचालक व कृषी सेवा महासंघ अध्यक्ष डॉ. कैलाश मोते, कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) दिलीप झेंडे, मृदसंधारण संचालक रविंद्र भोसले, कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक विकास पाटील, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक सुभाष नागरे, आत्माचे संचालक दशरथ तांभाळे, कृषी सह संचालक सुधीर ननावरे, पुणे विभागीय कृषी सह संचालक रफिक नाईकवडी, पुणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांच्यासह अन्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी आयोजित केलेल्या 10 फेब्रुवारी रोजीच्या ऑनलाईन बैठकीत झालेल्या या घटनेची पुनरावृत्ती पुन्हा कृषी विभागाच्या अधिकार्‍यांसमवेत होता कामा नये, अशा भावना अधिकार्‍यांनी व्यक्त करीत शासनाला या बाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी करणार असल्याचा पुनरुच्चार संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला. तसेच मागण्यांचे निवेदन कृषी संचालक विकास पाटील यांच्याकडे देण्यात आले.

दरम्यान, कृषी सेवा वर्ग – 1 अधिकारी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष आरिफ शाह यांनी कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना निवेदन देऊन स्मार्ट प्रकल्पात तांभाळे यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली असून सामुहिकरित्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी बोलताना कृषि सेवा महासंघाचे अध्यक्ष व राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलाश मोते म्हणाले,“स्मार्ट प्रकल्पातंर्गत ऑनलाईन बैठकीत 10 फेब्रुवारी रोजी प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी कृषी संचालक दशरथ तांभाळे यांना दिलेली वागणूक निंदनीय व खेदजनक आहे. त्याचा आम्ही निषेध करीत असून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दिवसभर कृषि अधिकार्‍यांनी काळ्या फिती लावून काम केलेले आहे. वास्तविक कृषी संचालक (आत्मा) दशरथ तांभाळे यांचा स्मार्ट प्रकल्पाच्या उभारणीत सिंहाचा वाटा राहिलेला आहे. स्मार्ट प्रकल्पाचे संचालक पदी आत्तापर्यंत भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) तीन अधिकारी बदलून गेलेले आहेत. अशा स्थितीमध्ये कृषी अधिकार्‍यांना डावलून त्यांना चुकीची वागणूक देणे, बाहेर काढून टाका असे बोलणे ही शोभनीय बाब नाही. शासनाला संघटनेमार्फत आणि आस्थापना विभागामार्फत आम्ही आमची भुमिका कळवून कारवाईची मागणी करीत आहोत.

Back to top button