शेवगाव : दोनशेहून अधिक तरुण कर्करोगाने बाधित ; पोलिस अन् औषध प्रशासन विभाग गप्पच | पुढारी

शेवगाव : दोनशेहून अधिक तरुण कर्करोगाने बाधित ; पोलिस अन् औषध प्रशासन विभाग गप्पच

शेवगाव तालुका : वृत्तसेवा : सुपारीपासून तयार केलेल्या घातक माव्यामुळे शेवगाव तालुक्याचे अर्थकारण बदलत असताना त्याच्या सेवनामुळे मात्र तरुण पिढी कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने कायमस्वरूपी उद्ध्वस्त होत आहे. आरोग्य विभागाच्या मते जवळपास दोनशेहून अधिक रुग्ण तोंडाच्या कर्करोगाने बाधित असण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे मोठी आर्थिक उलाढाल असणारा हा उद्योग सर्वसामान्य व युवापिढीसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. शेवगावमधील घातक मावा व्यवसाय शहरासह तालुक्यात फोफावत चालला आहे. जागोजागी, गल्लीबोळात पसरलेल्या लहानमोठ्या टपर्‍यांमुळे सहज उपलब्ध होणारा माव्याच्या व्यसनाने तरुण, विद्यार्थी, व्यावसायिकांसह नागरिकांना बळी बनवले आहे.

त्यातील घातक रसायने मुखाच्या दुर्धर आजारास कारणीभूत ठरत आहेत. माव्याच्या सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांत वाढ होत असून, आरोग्य विभागाच्या मते जवळपास दोनशेहून अधिक रुग्ण या रोगाने पीडित असल्याची शक्यता आहे. शहरातील अनेक उपनगरात हळूहळू हा व्यवसाय जोमाने उभा राहू लागला असून, निवासी इमारतीच्या तळजमल्यावर, उपनगरात माळरानावर शेडमध्ये जवळपास 30 ते 35 सुपारी कांडप गिरण्या कच्चा माल तयार करण्याचे काम करत आहेत. छोट्याशा मशीन गिरणीच्या सहायाने व्यवसायिकांची मोठी कमाई सुरू आहे.

माव्यासाठी लागणारी सुपारी, सुंगधी तंबाखू, विशिष्ट रंग व इतर साहित्य कर्नाटक, गुजरात येथून कंटेनरने येथे येत असल्याची माहिती आहे. त्यात हिरा, गोवा, विमल हा गुटखाही मोठ्या प्रमाणात उतरवला जात आहे. या प्रकारची पोलिस व अन्न भेसळ विभागाला सर्व माहिती असताना केवळ यातून मिळणार्‍या वरकमाईमुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

खाणार्‍यांचेही तोंडचे पाणी पळाले
दैनिक ‘पुढारी’ मधील वार्तांकनानंतर या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, त्यात वापरण्यात येणार्‍या घातक, नशील्या पदार्थामुळे मावा खाणार्‍यांचे देखील तोंडचे पाणी पळाले आहे.

Back to top button