पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मालवाहू वाहनांना बंदी | पुढारी

पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मालवाहू वाहनांना बंदी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी मालवाहू जडवाहनांना मनाई करण्यात आली आहे. यामधून केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळण्यात आली आहेत. हा रस्ता मालवाहू जडवाहनांना दिवसा आणि रात्रीही वापर करता येणार नाही, असे वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे. गणेशखिंड रस्त्यावरून अत्यावश्यक सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, पोलिस वाहने, महापालिकेची वाहने, प्रवासी वाहतूक करणारी वाहने तसेच मेट्रोच्या कामासाठीच्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.

हडपसरकडून पुणे शहरातून मुंबईकडे जाणारी जडवाहनांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. मुंबईकडे जाणार्‍या मालवाहू वाहनांनी हडपसर, सासवड रस्ता, कात्रज-कोंढवा रस्ता, कात्रजमार्गे मुंबईकडे जावे. नगर रस्त्याने मुंबईकडे जाणार्‍या वाहनांनी नगर रस्ता, खराडी बायपास चौक, शास्त्रीनगर चौक, डॉ. आंबेडकर चौक, जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने जाण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

जडवाहतुकीस बंद असणारे रस्ते गणेशखिंड रस्ता-संचेती चौक ते राजीव गांधी पूल (दोन्ही बाजूने) – बाणेर रस्ता- राधा चौक ते शिवाजीनगरकडे येण्यासाठी-पाषाण रस्ता-सूस तसेच शिवाजीनगरकडे येण्यासाठी-सेनापती बापट रस्ता- विधी महाविद्यालय रस्त्यावरून सेनापती बापट रस्ता चौकाकडे येणारी वाहने.

Back to top button