डेक्कन, चतु:शृंगी वाहतूक विभागांतर्गत; वाहतूक व्यवस्थेत बदल | पुढारी

डेक्कन, चतु:शृंगी वाहतूक विभागांतर्गत; वाहतूक व्यवस्थेत बदल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत होण्याच्या दृष्टीने डेक्कन वाहतूक विभागांतर्गत चैत्राली को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड ते क्षितिज बंगल्यापर्यंत (जकातदार पथ) दोन्ही बाजूस अंदाजे 250 ते 300 मीटर नो-पार्किंग करण्यात येणार आहे. तसेच, चतु:शृंगी वाहतूक विभागांतर्गत पाषाण-सूस पुलावर सुरक्षित वाहतूक सुरू राहावी तसेच अपघात टाळण्याच्या दृष्टीने वाहतुकीत बदल करण्याबाबत तात्पुरते आदेश काढण्यात आले आहेत.

चतु:शृंगी वाहतूक विभाग पाषाणकडून सूसकडे जाणार्‍या रस्त्यावर सूस पुलाच्या अलिकडे उजवीकडे वळण्यास मनाई करण्यात येत आहे. त्याऐवजी नागरिकांनी पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. पुणे-बंगळुरू महामार्गालगतच्या सोसायटीतील नागरिकांनी सूस पूल पार करून 200 मीटर अंतरावर उजवीकडे वळून ननावरे भुयारी मार्गाने इच्छितस्थळी जावे.

पाषाण मार्ग साताराकडे पुणे-बंगळुरू महामार्गालगत जाण्यासाठी वाहनचालकांनी साई चौक पाषाण येथून डावीकडे वळून सुतारवाडी पाषाणमार्गे इच्छितस्थळी जावे. हिंजवडी, सूस तसेच मुंबईकडे जाण्यासाठी सूस पूल पार करून 200 मीटर अंतरावर उजवीकडे वळून सेवा मार्गाने मुंबईकडे तसेच सूसकडे इच्छितस्थळी जावे.

सूचना, हरकती पाठवा
नागरिकांनी आपल्या सूचना असल्यास पोलिस उपायुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, बंगला क्रमांक 6, येरवडा टपाल कचेरीजवळ, पुणे येथे 25 फेब्रुवारीपर्यंत लेखी स्वरूपात कळवाव्यात. नागरिकांच्या सूचना व हरकती विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार आहे. फायर ब्रिगेड, पोलिस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना हे आदेश लागू नसतील, असे पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

Back to top button