शिर्सुफळला हायमास्ट दिवे बंदच; तक्रार करूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष | पुढारी

शिर्सुफळला हायमास्ट दिवे बंदच; तक्रार करूनही ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

उंडवडी(ता.बारामती); पुढारी वृत्तसेवा : शिर्सुफळ गावामधील हायमास्ट दिवे बंद पडले प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील दिवा बंद पडल्याने रुग्णांना जाण्या-येण्यासाठी त्या ठिकाणी अंधार असतो. याबाबत ग्रामपंचायतीला वारंवार सांगूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ प्रकाश पडावा म्हणून गेल्या वर्षी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हायमास्ट दिवा बसवला होता. मात्र, हा दिवा थोडे दिवस सुरू राहिला व नंतर बंदच आहे. त्याचप्रमाणे गावात 14 हायमास्ट दिवे बसवले आहेत. मात्र, त्यामधील एक किंवा दोनच दिवे सुरू आहेत. नागरिकांनी तक्रार करूनही ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असून, उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.

गावापासून पाच किलोमीटर अंतरावर गारमाळ वस्ती आहे. वस्तीवर दिव्याची गरज भासते, परंतु या ठिकाणचाही दिवा बंद आहे. शिर्सूफळ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील या ठिकाणी मोठ-मोठ्या लोकवस्ती आहेत. येथे नागरिकांना सुविधा मिळाव्यात म्हणून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हायमास्ट दिवा बसवला. मात्र, तो फक्त नावालाच ठरला आहे. दिवा बसवल्यापासून फक्त काही दिवस या दिव्यांचा प्रकाश पडला. हायमास्ट दिवा म्हटले की, चार बाजूंनी मोठे एलइडी चार दिवे असतात. मात्र, या ठिकाणी एक किंवा दोनच एलईडी आहेत. हा दिवा बंद पडल्यापासून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीत तक्रार केली आहे. परंतु अद्याप दिवे चालू झालेले नाहीत.

ग्रामपंचायतीसमोरचा अंधारही मिटेना
ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी समोर असलेला दिवा अज्ञात वाहनाच्या धडकेत पडला आहे. मात्र, याविरुद्ध कोणत्याही ग्रामस्थांनी व पदाधिकार्‍यांनी कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरा असूनही त्या वाहनचालकावर कारवाई का होत नाही, अशी चर्चा नागरिक करीत आहेत.

गावामध्ये गेल्यावर्षी हायमास्ट बसवले होते. मात्र, ते सहा महिन्यांमध्ये बंद पडले आहेत. आरोग्य केंद्रासह गावातील चौकांमध्ये बसवलेले सर्व हायमास्ट दिवे बंद आहेत. प्रशासनाने दुर्लक्ष न करता हे दिवे लवकरात लवकर दुरूस्त करावेत.

                                                              विजय आटोळे, ग्रामस्थ.

Back to top button