आम्ही खोक्यांना हात लावला नाही, असे कुणी का म्हणाले नाही :आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर सडकून टीका | पुढारी

आम्ही खोक्यांना हात लावला नाही, असे कुणी का म्हणाले नाही :आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर सडकून टीका

पुढारी ऑनलाईन: कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या निधनानंतर या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. भाजप आणि राष्ट्रवादीने चिंचवड पोटनिवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू केला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे. नाना काटे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. काटे यांच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने कंबर कसली आहे. सोमवारी चिंचवडमध्ये महाविकास आघाडीची सभा झाली. या सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबतचे ४० गद्दार आमदार जातात तिथे ५० खोक्यांची घोषणा दिली जाते. त्यानंतर ही घोषणा ऐकल्यावर त्या घोषणा देणाऱ्या व्यक्तीच्या मागे पोलिसांना पाठवलं जातं. लागलीच त्यांच्या घरावर धाड पडते. केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या मागे लागते. परंतु राज्यात झालेली ही गद्दारी जनतेला अजिबात आवडलेली नाही. मुख्यमंत्री आणि ४० आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत वार केले.

आम्ही खोक्यांना हात लावले नाहीत, असे 40 आमदारांमधील कुणी का म्हणाले नाही, असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना केला. तर सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या कार्यकर्त्यांवर केंद्रातील तपस यंत्रणेकडून धाड पडत आहे, असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला आहे. सध्या राज्यात गलिच्छपणाचे राजकारण सुरू आहे. आम्ही महाविकास आघाडी ही जनतेसाठी केली आहे, तर त्यांची आघाडी ही केवळ सत्तेच्या खुर्चीेसाठी असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. म्हणूनच त्यांच्या सभेत खुर्च्यांची गर्दी दिसते, असा जोरदार टोलाही मुख्यमंत्र्यांच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांवरुन लगावला आहे.

जरी आमची विचारसरणी वेगळी असली तरी लोकशाही टिकविण्यासाठी आम्ही एकत्र आलो. आम्हाला सत्तेची कुठलीही हाव नव्हती. मविआची सत्ता ही राज्यातील जनतेची होती. काही भाजप पुरस्कृत गद्दार सरकारने महाराष्ट्र प्रगती करत असल्याने राज्याची प्रगती रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या पाठित 40 वार केले, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

Back to top button