पिंपरी : दिवसभरात एकही अर्ज मागे नाही | पुढारी

पिंपरी : दिवसभरात एकही अर्ज मागे नाही

पिंपरी : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये चुरस वाढली आहे. भाजप, महाविकास आघाडी यांच्यासोबतच बंडखोर, अपक्ष उमेदवारांनीदेखील निवडणूक लढवण्यासाठी अर्ज भरले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या गुरुवारी (दि. 9) पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवार निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारीअर्ज भरण्यास 31 जानेवारीपासून सुरुवात झाली. मुदतीत फेब—ुवारी (दि.7) पर्यंत 40 उमेदवारांनी 53 अर्ज दाखल केले. अर्जाची छाननी बुधवारी (दि. 8) झाली. त्यात आम आदमी पार्टीसह 7 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. मैदानात 33 उमेदवार शिल्लक आहेत. शुक्रवारी (दि.10) दुपारी तीनपर्यंत अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत आहे. दुपारपर्यंत किती उमेदवार अर्ज मागे घेतात, याची उत्सुकता लागली आहे.

उमेदवाराने अर्ज माघारी घेण्यासाठी नमुना अर्ज स्वत: भरून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे द्यायचा असतो. त्यासाठी उमेदवाराला स्वत: हजर राहावे लागते. अधिकार्‍यांनी तो अर्ज वैध असल्याचे घोषित केल्यास अर्ज माघारी घेतल्याचे स्पष्ट होते. त्यानंतर निवडणुकीतून तो उमेदवार बाहेर होतो. अर्ज माघारीची मुदत शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत आहे. त्यानंतर जितके उमेदवार शिल्लक राहतात. त्या सर्वांना निवडणूक चिन्हाचे वाटप केले जाते. राष्ट्रीय व राज्य नोंदणीकृत राजकीय पक्षांना ठरलेले निश्चित चिन्ह असते. तर, नोंदणीकृत नसलेल्या व अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हापैकी एक चिन्ह दिले जाते.

एकच चिन्ह एकापेक्षा अनेक उमेदवारांनी मागितल्यास निवडणूक निर्णय अधिकारी चिठ्ठी काढून चिन्ह देतात. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) 26 फेब—ुवारीला मतदान होणार आहे. ते मशिन हॅक होण्याचा धोका आहे. त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका प्रलंबित आहेत. त्यामुळे ईव्हीएमऐवजी कागदी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी अपक्ष उमेदवार रफिक कुरेशी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे केली आहे.

Back to top button