पुणे : रेल्वेचे बनावट नियुक्तिपत्र; टोळीतील दोघांना अटक | पुढारी

पुणे : रेल्वेचे बनावट नियुक्तिपत्र; टोळीतील दोघांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रेल्वेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून तसेच बनावट नियुक्तिपत्र देत बारा बेरोजगारांची तब्बल 10 लाख 81 हजार रुपयांची फसवणूक करणार्‍यांच्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक 1 ने बेड्या ठोकल्या. त्यांच्यासह तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश संतराम माने, नीलेश माने (रा. ताडीवाला रस्ता) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अभिषेक विजय तांबे (रा. कात्रज) अशा तिघांविरुद्ध एकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी एका व्यक्तीने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व संशयित आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दरम्यान, तांबे, माने यांनी ओळखीचा गैरफायदा घेत फिर्यादी व त्यांच्या नातेवाइकांना पुणे रेल्वेच्या रेल्वे मेल सर्व्हसि (आरएमएस) या विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्यांनी फिर्यादी व त्यांचे नातेवाइक यांच्याकडून गुगल पेद्वारे दहा लाख 81 हजार रुपये इतकी रक्कम घेतली. त्यानंतर त्यांनी भारतीय रेल्वेची मुद्रा असणारे व ‘आरएमएस’ विभागातील नोकरीचे बनावट स्वाक्षरीचे नियुक्तिपत्र दिले. फिर्यादीसह अन्य व्यक्ती नियुक्तिपत्र घेऊन रेल्वे प्रशासनाकडे गेल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

ही कारवाई उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुजीत वाडेकर, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, मनोजकुमार साळुंखे, मारुती पारधी, विशाल दळवी, संदीप शिर्के, रेहाना शेख आदींच्या पथकाने केली.

असे अडकले ट्रॅपमध्ये
योगेश माने व नीलेश माने हे दोन संशयित आरोपी पुणे रेल्वे स्थानकाच्या पार्सल गेट येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर यांच्या पथकाने पार्सल गेट परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडून खाकी रंगाचे आठ लिफाफे, प्रत्येक लिफाफ्यात बनावट नियुक्तिपत्र, बँकेची चार चेकबुक, पाच बँक पासबुक, सेंट्रल रेल्वेची 10 बनावट नियुक्तिपत्रे, दोन मोबाईल, रेल्वेचे बनावट ओळखपत्र असा 99 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Back to top button