पुणे : सहलीला निघालेल्या बसचे ब्रेक निकामी | पुढारी

पुणे : सहलीला निघालेल्या बसचे ब्रेक निकामी

भोर : पुढारी वृत्तसेवा :  मांढरदेवीचे दर्शन घेऊन किल्ले रायगडाच्या दिशेने खासगी क्लासमधील 34 विद्यार्थी व शिक्षकांना घेऊन जाणार्‍या मोरगाव सहलीच्या भरधाव लक्झरी बसचा ब्रेक अचानक निकामी झाला. या वेळी चालकाने प्रसंगावधान राखत बसबाहेर उडी मारून बसला रोखण्यासाठी प्रयत्न केला व तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी देखील टायरखाली दगड, धोंडे टाकून बस थांबविली. यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली. बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. भोरमधील चौपाटी येथे शनिवारी (दि. 4) सायंकाळी 6 च्या सुमारास हा अपघात घडला.

बारामती तालुक्यातील मोरगाव येथील कर्मवीर क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मांढरदेवी व रायगडला आयोजित केली होती. त्यानुसार खासगी लक्झरी बस (एमएच 12 एचसी 9119) करण्यात आली होती. या बसमध्ये इयत्ता नववी, दहावीचे 34 विद्यार्थी व शिक्षक होते. शनिवारी (दि. 4) मांढरदेवीचे दर्शन घेऊन बस रायगड येथे जात होती. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास बस भोर येथील चौपाटी परिसरात आली. या वेळी अचानकपणे बसचा ब्रेक निकामी झाला.अशा परिस्थितीत चालकाने प्रसंगावधान राखून बसच्या बाहेर उडी मारली आणि बसला रोखण्यासाठी प्रयत्न केला. या वेळी तेथे असलेल्या नागरिकांनी देखील टायरखाली दगड, धोंडे टाकून बस थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला. बसमधील सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. चालकाच्या धाडसाचे कौतुक होत आहे. या घटनेची माहिती मिळताच भोरचे पोलिस जवान सुनील चव्हाण व शौकत शेख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली.

Back to top button