…अन्यथा बुमराहची कारकीर्द उद्ध्वस्त होईल : जेफ थॉमसन | पुढारी

...अन्यथा बुमराहची कारकीर्द उद्ध्वस्त होईल : जेफ थॉमसन

मेलबर्न, वृत्तसंस्था : कसोटी किंवा मर्यादित षटकांचे क्रिकेट यापैकी कोणता तरी एकच फॉरमॅट जसप्रीत बुमराहने ठरवायला हवा. तसे केले नाही तर त्याची कारकीर्द उद्ध्वस्त होण्याचा धोका संभवतो, असे विधान ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू आणि वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट जगतात खळबळ माजली आहे.

सध्याच्या काळात माझ्यासाठीही कसोटी क्रिकेट खेळणे खूप कठीण गेले असते. सध्या छोट्या फॉरमॅटमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळत आहेत. पैशामुळे तुमचे आयुष्य स्थिरस्थावर होत जाते. आम्ही पैशांचा विचार केला नाही. कारण, आमच्या काळात क्रिकेटमध्ये एवढा पैसाच नव्हता. आता हा खेळ म्हणजे अवाढव्य व्यवसाय झाला आहे. त्यामुळे अनेक पर्याय तुमच्यापुढे उपलब्ध आहेत. नेमके कोणत्या फॉरमॅटमध्ये करिअर करायचे हे तुम्हाला ठरवता येऊ शकते. बुमराहच्या बाबतीत मी तेच सांगेन, असेही जेफ थॉमसन यांनी म्हटले आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळले जात आहे. आम्ही हंगामानुसार क्रिकेट खेळायचो. हिवाळ्यासाठी इंग्लंडला जायचो आणि तिथे जवळपास साडेचार महिने क्रिकेट खेळत असू. हा दौरा प्रदीर्घ असायचा. त्याचा फायदा असा व्हायचा की, आम्ही ख्रिसमसमध्ये आराम करायचो. बुमराहला जास्त काळ क्रिकेट खेळायचे असेल तर त्याने क्रिकेटमधील कोणता फॉरमॅट खेळायचा याबाबत शक्य तेवढ्या लवकर निर्णय घ्यावा, असेही थॉमसन म्हणाले.

दरम्यान, बुमराह हा सप्टेंबर महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. दुखापतीमुळे त्याला मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले. पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह हैराण झाला असून श्रीलंकेच्या दौर्‍यामध्ये तो पुनरागमन करणार होता. तथापि, पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला माघार घेणे भाग पडले होते. आतादेखील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी तो संघाबाहेर असेल. मात्र, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आशा आहे की, तो उर्वरित सामन्यांपर्यंत फिट होऊन संघात परतेल.

संघात परतण्याबद्दल प्रश्नचिन्ह

दरम्यान, जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 30 कसोटी सामने खेळले आहेत. यामधील 58 डावांमध्ये त्याने 128 विकेटस् घेतल्या आहेत. कसोटीमध्ये 34 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो संघातील महत्त्वाचा खेळाडू असून आणखी किती दिवस त्याला दुखापतीमुळे बाहेर बसावे लागणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

हेही वाचा…

Back to top button