मराठी साहित्य संमेलन : सामाजिक तळमळीतूनच साहित्यिकाचा जन्म – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

मराठी साहित्य संमेलन : सामाजिक तळमळीतूनच साहित्यिकाचा जन्म - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वर्धा, पुढारी वृत्तसेवा : समाजाला भेडसावणारे मुद्दे, त्याविषयी वाटणारी तळमळ आणि सामाजिक जाणीव यातूनच एक उत्तम आणि जबाबदार साहित्यक जन्माला येतो, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. वर्धा येथील राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरीमध्‍ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. स्‍वावलंबी शिक्षण मंडळाच्या प्रांगणात या साहित्‍य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून साहित्‍य नगरी सजली आहे. ५३ वर्षानंतर अ.भा.साहित्य संमेलन वर्धा येथे आयोजित करण्यात आले आहे.

उद्घाटनप्रसंगी राज्‍याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक न्‍या. नरेंद्र चपळगावकर, मावळते संमेलनाध्‍यक्ष ज्‍येष्‍ठ साहित्यिक भारत सासणे, स्‍वागताध्‍यक्ष माजी खासदार दत्ता मेघे यांच्‍यासह ज्‍येष्‍ठ हिंदी कवी व समीक्षक डॉ. विश्‍वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्‍वास, अखिल भारतीय महामंडळाच्‍या अध्‍यक्ष प्रा. उषा तांबे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांची उपस्थिती होती.

दरम्यान, संमेलनाचे अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर यांनी थोडक्यात व्यक्त केलेल्या मनोगतात विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला. शासन आयोजित साहित्य संमेलनाबाबत बोलताना त्यांनी असे आयोजन स्वायत्त संस्थांमार्फत व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सुरुवातीला विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष प्रदीप दाते यांनी मनोगत व्यक्त केले.

विदर्भ साहित्य संघाचे माजी अध्यक्ष दिवंगत मनोहर म्हैसाळकर यांच्या स्मृतींना उजाळा देत साहित्य परंपरा जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी वर्ध्याच्या साहित्य संमेलनाचे विशेष महत्व विशद केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी केले तर सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले. यावेळी विदर्भ साहित्य संघ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सदस्य उपस्थित होते.

भाषेचे महत्‍व जपणे गरजेचे – दीपक केसरकर

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पुस्तकांचे आणि भाषेचे महत्व जपणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. साहित्यिक मंडळीला अधिक सोयी सुविधा मिळाव्या म्हणून साहित्य भवन मुंबई मध्ये निर्माण होत आहे. साहित्यिक तिथे राहू शकतील, इथे नाट्यगृह आणि इतर सोयी सुविधा असेल आणि दोन वर्षांनी ते उपलब्ध होणार आहे, अशी माहिती दिली. महाराष्ट्रात कायम साहित्यिक आणि त्यांच्या विचारांचा, सूचनांचा आदर होईल. साहित्यिक आणि राजकारणी यात आणीबाणीची स्थिती कधीही येणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. पुढच्या मराठी भाषा विश्व संमेलनाला १५ कोटींची तरतूद केल्याची माहिती दिली.

हेही वाचंलत का?

Back to top button