पुणे : पीएमपीएमएल बसअभावी सर्वसामान्यांचे प्रचंड हाल | पुढारी

पुणे : पीएमपीएमएल बसअभावी सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

पाटस : पुढारी वृत्तसेवा  : दौंड तालुक्याची राजकीय व आर्थिक राजधानी समजल्या जाणार्‍या पाटस (ता. दौंड) येथून वरवंड-यवत-हडपसरपर्यंत पीएमपीएमएल बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवासी, महिला आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. गुरुवार, दि. 24 फेब—ुवारी 2022 रोजी पाटस-कुरकुंभ ते हडपसर अशी पीएमपीएमएल बससेवा सुरू झाली होती. त्या वेळी पाटस परिसरातील अनेकांनी सोशल मीडियावर आपण केलेल्या पाठपुराव्याचे पत्र, आजी-माजी आमदारांनी केलेल्या पत्रव्यवहाराचे फोटो व वृत्त टाकून श्रेय घेण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, सध्या भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना सुरू असल्याने नागरिकांची वर्दळ या गावात वाढली आहे, तर विद्यार्थ्यांना सकाळी शाळा तसेच महाविद्यालयांत ये-जा करण्यासाठी बसची वाट पाहावी लागत आहे. मात्र, पीएमपीएमएल बस पाटसपर्यंत येत नाही. त्यामुळे मागील काळात श्रेय घेणारे गप्प का? असा प्रश्न पाटस नागरिकांना पडला आहे.

Back to top button