रत्नागिरी : चिपळूण येथे उभारलेत जिवंत माणसाचे पुतळे | पुढारी

रत्नागिरी : चिपळूण येथे उभारलेत जिवंत माणसाचे पुतळे

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा : कोणी जवळ येऊन काठी हलवत आहे… कोणी हात लावण्याचा प्रयत्न करतोय… तर कोणी एखादी काडी घेऊन टोचून पाहतोय… तर कोणी हा पुतळा नव्हेच असे बोलून केवळ एक नजर टाकून पुढे सरकतोय, असा अनुभव चिपळूणमधील ‘फन एन फेअर’ मध्ये येतोय. आणि ‘हा माणूस की पुतळा’ हा प्रश्न सर्वांनाच पडतोय !

शहरातील रोट्रॅक क्लबच्या वतीने खेंड येथील मैदानावर ‘फन अँड फेअर’चे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या महोत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपने येथे येणाऱ्या सर्वांची मने जिंकली आहेत. या संदर्भात ग्रुपचे मनोज कल्याणकर यांना विचारले असता ते म्हणाले, वीस – बावीस वर्षांपूर्वी ही कला जोपासण्यास आपण प्रारंभ केला. बांदा येथील काही लोकांकडून दीपावली शोचे आयोजन केले जायचे.

या निमित्ताने फॅन्सी ड्रेस स्पर्धा तसेच स्टॅचू स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. या स्पर्धेत आपण सातत्याने भाग घेत गेलो. आणि तब्बल 11 वेळा स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला. मात्र, काही वर्षांनी हा कार्यक्रम बंद पडला. यानंतर आपण स्टॅच्यू करणाऱ्या अनेक मुलांना एकत्रित केले. तीस मुलांचा अलाईव्ह स्टॅचू ग्रुप बांदा तयार केला. बांधा ते चांदा ही कला प्रदर्शित करण्याचा मानस केला.

रत्नागिरी जिल्ह्यात प्रथमच चिपळूणमध्ये ही कला सादर होत आहे. याआधी पुणे, नाशिक, सिंधुदुर्ग अन्य ठिकाणी सादरीकरण केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे येथे तब्बल 12 तास जिवंत पुतळा करण्यात करण्याचे रेकॉर्ड आमच्या ग्रुपने केले आहे. मात्र आता सहा ते आठ तासापर्यंत जिवंत पुतळा करण्यात आमचा हातखंड आहे. अनेक वेळा बघणाऱ्यांना प्रश्न पडतो, हा पुतळा मातीचा ,प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा असावा. मात्र, जिवंत मानवी पुतळा असल्याचे लक्षात येताच अनेक जण नवल व्यक्त करतात.

मनोज कल्याणकर यांच्या साथीला विवेक आंबीए , स्त्री पुतळा करण्यामध्ये माहीर असलेला प्रमुख कलाकार प्रशांत सावंत, विवेक आंबिए, मंदार सावंत, भाई महादभूत, अनुज बांदेकर, योगेश सावंत, कमलेश सावंत, कमलेश सावंत आदी 30 युवक या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत. यांची जिवंत पुतळ्याची कला थक्क करते.

त्यांनी आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, दादासाहेब फाळके, संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज भेट, स्वराज्याची शपथ, कळशी घेतलेली महिला, कुस्तीचा आखाडा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, श्री साईबाबा, स्वच्छता अभियान असे अनेक जिवंत पुतळे साकारले आहेत. पर्यटन महोत्सव, संमेलन ,राजकीय सभा अशा विविध ठिकाणी त्यांना कला सादर करण्याची संधी दिली जाते. चिपळूणमध्ये त्यांच्या या कलेचे भरभरून कौतुक होत आहे .

कोकणचे मध्यवर्ती केंद्र असणाऱ्या चिपळूणमध्ये जिवंत पुतळा साकारण्याची संधी मिळावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत होतो. गेली दोन वर्ष प्रयत्न केला. मात्र, आता ती संधी मिळाली, त्या माध्यमातून आमची कला सर्व दूर पोहोचेल, हा विश्वास होता. आणि तो सार्थ ठरला आहे.

चिपळूण मधील जिवंत पुतळा पाहून एका बेंगलोर येथील उद्योगपतीने आम्हाला बेंगलोरचे निमंत्रण दिले आहे. आजपर्यंत फक्त राज्यातच ही कला सादर केली. चिपळूण कला सादर केल्यानंतर महाराष्ट्र बाहेर प्रथम जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ही कला संपूर्ण देश प्रसिद्ध करू, असा विश्वास मनोज कल्याणकर यांनी ‘दै पुढारी’ बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा;

ठाणे : उल्हास नदी पात्रता पुन्हा जलपर्णीचा उद्रेक!; ‘चला जा‍‍णुया नदीला अभियान’ कागदावर

नाशिकमध्ये बिबट्या झाला जेरबंद

‍’एमपीएससी’ मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पर्यंत पुढे ढकला : मुख्यमंत्री

Back to top button