ठाणे : उल्हास नदी पात्रता पुन्हा जलपर्णीचा उद्रेक!; ‘चला जा‍‍णुया नदीला अभियान’ कागदावर | पुढारी

ठाणे : उल्हास नदी पात्रता पुन्हा जलपर्णीचा उद्रेक!; 'चला जा‍‍णुया नदीला अभियान' कागदावर

मुरबाड; पुढारी वृत्तसेवा : मुरबाड-कल्याण या राष्ट्रीय महामार्ग असलेल्या कल्याण तालुक्यातील तसेच ठाणे जिल्हाची जलजीवन वाहिनी समजली जाणारी उल्हास नदी सध्या प्रचंड प्रमाणात प्रदूषणाच्या विलाख्यात सापडली आहे. बदलापूर, भिसोल, आपटी बंधारा, रायते नदी पुल, कांबा, वरप मोहना पंप हाऊस या भागात पाण्यात वाहत येणारी जलपर्णी मोठी डोकेदुःखी ठरत आहे. नदीवर हिरवा गलिच्छा पसरला आहे. नदी प्रदूषणाला कारणीभुत असणाऱ्या गोष्टीकडे शासनाचे व प्रदूषण मंडळाचे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

शहरातून व गावातून वाहत येणारे नाले-गटारे, विविध कारखान्यातील केमिकलयुक्त पाणी, प्लास्टिक, टाकाऊ पदार्थासह अनेक गोष्टी नदी पात्रता सोडल्या जातात. याबाबत प्रदूषण मंडळाकडे वारंवार तक्रार करून सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे. मागच्या वर्षी सुद्धा नदी पात्रता मोठया प्रमाणत जलपर्णी पसरली होती. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी उपाय योजना करून जलपर्णी कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मागील चार ते पाच महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी दालनात बैठक होऊन ‘चला जा‍‍णुया नदीला’ या अभियानाअंतर्गत जिल्हातील सर्व नद्या प्रदूषण मुक्त करणार अशी घोषणा केली आहे. परंतु, ही योजना अमंलात येत नसून शासनाचे योजनेकडे पूर्ण दुर्लक्ष झालेले दिसते.

‘चला जा‍‍णुया नदीला’ ही योजना ठाणे जिल्हात लवकरात- लवकर राबवणे गरजेचे असून जिल्हातील नद्या प्रदूषण मुक्त केल्या पाहिजेत, दूषित पाण्यामुळे जळपास ३५ लाख नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले, या जलपर्णीचा तात्काळ बंदोबस्त करावा व नद्या प्रदूषणमुक्त कराव्या यासाठी आपण ठाणे जिल्हाधिकारी व जलसंपदा व पर्यावरण मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. तर हा गंभीर विषय तात्काळ सोडवावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस राम सुरोशी, उल्हासनदी बचाव कृती समिती कार्यकर्ते व ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button