पुणे: मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून शाळकरी विद्यार्थ्याकडून मित्रावर कोयत्याने हल्ला | पुढारी

पुणे: मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून शाळकरी विद्यार्थ्याकडून मित्रावर कोयत्याने हल्ला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता गॅंग यांची प्रचंड दहशत निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच पुण्यात मैत्रिणीशी बोलत असल्याच्या कारणाने एका नामाकिंत शाळेतील सतरा वर्षीय विद्यार्थ्यांने दुसऱ्या मित्रावर कोयत्याने वार करून त्यास जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

जखमी झालेला विद्यार्थी हा बारावीमध्ये शिकत असून पद्मवती भागात राहायला आहे, तर आरोपी मुलगा हा तुळशीबागेत काम करतो. संशियत आरोपीच्या मैत्रिणीशी जखमी झालेला अल्पवयीन मुलगा शाळे जवळील बसस्टॉपवर बोलत होता. आपल्या मैत्रिणीशी बोलतो याचा राग आरोपीला आला आणि त्याने बोलत असलेल्या मित्रावर कोयता उगारत त्यास जखमी केले. या हल्ल्यात शेजारी असलेल्या विद्यार्थ्याला देखील जखमी झाला. या प्रकारानंतर संबंधित परिसरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर जवळच असलेल्या वाहतूक पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले.

शाळकरी विद्यार्थ्यांवर कोयत्याने हल्ला झाल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला झालेल्या विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती स्थिर आहे. विशेष म्हणजे कालच पोलिसांनी या शाळेत जाऊन या गुन्हेगारीबद्दल विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले होते.

Back to top button