Pariksha Pe Charcha 2023 Live :’दडपण न घेता, सर्वोत्तम प्रयत्न करा’; पंतप्रधान मोदी गुरूजींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र | पुढारी

Pariksha Pe Charcha 2023 Live :'दडपण न घेता, सर्वोत्तम प्रयत्न करा'; पंतप्रधान मोदी गुरूजींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

पुढारी ऑनलाईन : कुटुंबांना आपल्या मुलांकडून अपेक्षा असणे स्वाभाविक आहे, पण केवळ ‘सोशल स्टेटस’ टिकवण्यासाठी आपल्या मुलांकडून अवास्थव अपेक्षांचे ओझे टाकणे हे धोकादायक आहे. म्हणून पालकांनी आपल्या मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकू नये. तसेच विद्यार्थ्यांनी देखील कोणत्याही गोष्टीचे दडपण न घेता. आपले सर्वोत्तम प्रयत्न करावे, असा उपदेश पीएम मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पालक आणि विद्यार्थ्यांना दिला आहे. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधत आहेत.या कार्यक्रमात देशभरातील दोन हजार विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी झाले आहेत. १५५ देशांतील अनेक विद्यार्थी लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

याप्रसंगी बोलताना पीएम मोदी ते म्हणाले,  देशातील युवक वर्ग काय विचार करतो हे महत्त्वाचे आहे. देशातील युवक सकारात्मक विचार करतात. त्याची स्वप्न, ध्येय ही काळानुसार बदलत आहेत. त्यामुळे आज ‘परीक्षा पे चर्चा’ ही माझीही परीक्षा असून देशातील कोट्यवधी विद्यार्थी आज माझी परीक्षा घेत आहेत. ही परीक्षा देताना मला आनंद होत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात व्यक्त केले.

दडपण न घेता, सर्वोत्तम प्रयत्न करा

जर तुम्ही अधिक चांगले काहीतरी करत असाल तर, तुमच्या आजूबाजूच्यांचा तुम्ही आणखी चांगले काम करण्यासाठी संभाव्य दबाव वाढत असतो. यातून कोणीही सुटलेले नाही. कोणत्याही दडपणाखाली राहू नका! विचार करा, विश्‍लेषण करा, कृती करा आणि मग तुम्हाला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा.

वेळेचे व्यवस्थापन करा

केवळ परीक्षेपुरतेच नाही तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेळेच्या व्यवस्थापनाचे भान ठेवले पाहिजे. तुम्ही असे नियोजन करा की, तुम्हाला कमी आवडणाऱ्या विषयाला अधिक वेळ द्या. त्यानंतर तुम्हाला आवडणाऱ्या विषयाला वेळ द्या.ही व्यवस्थापनाची कला तुम्ही तुमच्या आईकडून चांगल्याप्रकारे शिकू शकता असेही पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले.

स्वत:चे आत्मपरीक्षण करा

प्रत्येकाने आपल्या आतमध्ये पाहिले पाहिजे. यासाठी स्वत:ला आत्मपरीक्षणासाठी वेळ द्या. तुम्ही तुमची स्वतःची क्षमता, स्वतःच्या आकांक्षा, स्वतःची ध्येये ओळखली पाहिजेत. त्यानंतर इतर लोक तुमच्याकडून ज्या अपेक्षा ठेवतात, त्यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा.

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर परीक्षा

सध्या जीवन आणि जग खूप बदलत आहे, हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. आज तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर परीक्षा द्यायच्या आहेत. म्हणूनच अनेकांची फसवणूक करणारा एक-दोन परीक्षा पास होईल; पण आयुष्यात तो कधीच उत्तीर्ण होऊ शकणार नाही. हे विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे.

ध्येयावर लक्ष केंद्रीत करा

आपल्याला काय हवे आहे यावरही लक्ष केंद्रित केले पाहिजे. आधी काम समजून घ्या त्याचे नियोजन करा आणि कामाला सुरूवात करा.  जर मला काही साध्य करायचे असेल तर मला एका विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करावे लागेल तरच त्याचे परिणाम दिसून येतील.

‘स्मार्टली हार्डवर्क’ करा

असे काही लोक आहेत, जे खूप कष्ट करतात. पण काहींच्या जीवनाच्या शब्दकोशात ‘मेहनत’ हा शब्द देखील नसतो. काही जण हुशारीने काम करतात आणि काही हुशारीने कठोर परिश्रम करतात. त्यामुळे कोणतेही काम करताना केवळ हार्डवर्क महत्त्वाचे नाही तर, स्मार्टवर्कही महत्त्वाचे. म्हणून ‘स्मार्टली हार्डवर्क’ केले पाहिजे तरच त्याचे चांगले परिणाम मिळतील, असे पीएम मोदी म्हणाले. जे कठोर परिश्रम करतात त्यांना नक्कीच आनंदी आणि रंगांनी भरलेले जीवन मिळेल.

क्षमता ओळखा

जीवनात कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी स्वत:मधील क्षमता ओळखणे गरजेचे आहे. एकदा का तुम्ही हे सत्य स्वीकारले की माझ्यात ही क्षमता आहे आणि आता मला त्यानुसार गोष्टी करायच्या आहेत. ज्या दिवशी तुम्हाला तुमची क्षमता कळेल तेव्हा तुम्ही एक महान क्षमता बनाल.

पालकांनो! मुलांमध्ये न्यूनगंड येवू देऊ नये

प्रत्येक पालकाने आपल्या मुलांचे योग्य मूल्यमापन करावे. आपल्या मुलामधील क्षमता ओळखण्यास त्याला मदत करावी. मुलांमध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड येऊ देऊ नये यासाठी मुलांकडे लक्ष द्या, असा सल्लाही पीएम मोदी यांनी पालकांना दिला आहे.

Pariksha Pe Charcha 2023 : परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या आधी खास विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी आयोजित केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ज्यामध्ये पीएम मोदी देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्याशी चर्चा करतात.

Back to top button