संगमनेर : बंगला फोडून चोरट्याने लांबविले दागिने | पुढारी

संगमनेर : बंगला फोडून चोरट्याने लांबविले दागिने

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील गोल्डनसिटी परिसरात सहा सशस्त्र चोरट्यांनी दोन बंगले फोडले. पहिल्या बंगल्यातील एका महिलेच्या घरातून सव्वा तोळ्यांच्या दागिन्यांसह 8 हजार रुपयांची रोकड लंपास केली. तर बंद असलेल्या दुसर्‍या घरात त्यांनी उचकापाचक केली. परंतु चोरट्यांना या ठिकाणी काहीही सापडले नाही. त्यामुळे त्यांना हात हलवत बाहेर जावे लागले. याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेले अधिक माहिती अशी की, संगमनेर शहरातील गोल्डनसिटी परिसरामध्ये पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास चार ते पाच चोरटे शिरले.

त्यांनी सर्वप्रथम बॅटरीच्या उजेडात अनेक घरांची तपासणी केली असता दोन्हीही बंगले बंद असल्याचे त्यांना आढळले. त्यांनी आजूबाजूचा कानोसा घेत गोल्डन सिटीमध्ये राहत असणारे साहेबराव अरगडे यांचा बंगल्याचा दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील कपाटामधील सामानाची उचकापाचक केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे त्यांना हात हलवतच बाहेर पडावे लागले. यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा सुजाता रहाणे यांच्या बंद असलेल्या बंगल्याकडे वळविला.

घराचा दरवाजा तोडून आतील कपाटाची उचकपाचक करून कपाटात ठेवलेले 40 हजार रुपये किंमतीचे सव्वा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि 8 हजार रुपये रोख असा एकूण 48 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. चोरटे परिसरतील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरटे कैद झाले आहे. त्यामुळे हे चोरटे पकडने संगमनेर शहर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याबाबत निलेश बादशहा रहाणे यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दरोडेखोरांविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहेत.

Back to top button