ST Bus : ट्रेकिंग सिस्टिम, पॅनिक बटनची सुविधा : औरंगाबादेतील एसटी कार्यशाळेत अत्याधुनिक बस बांधणीला वेग | पुढारी

ST Bus : ट्रेकिंग सिस्टिम, पॅनिक बटनची सुविधा : औरंगाबादेतील एसटी कार्यशाळेत अत्याधुनिक बस बांधणीला वेग

औरंगाबाद: पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाने पारंपरिक बसऐवजी  (ST Bus) आता अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक बस बांधणीची कास धरली आहे. मुकुंदवाडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत बीएस- 6 बसची बांधणी सुरू केली आहे. या बसमध्ये अत्याधुनिक अशा ट्रेकिंग सिस्टिमसह प्रत्येक सीटजवळ पॅनिक बटन बसवण्यात आले आहे. ट्रेकिंग सिस्टिममुळे बसचे लोकेशन कळणार आहे. तर पॅनिक बटनमुळे प्रवाशांना तत्काळ मदत मिळणार आहे. अशा आधुनिक सुमारे 50 बसची बांधणी पूर्ण झाली आहे. या बस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती मध्यवर्ती कार्यशाळा व्यवस्थापक प्रमोद जगताप यांनी दिली.

बीएस-6 प्रणालीच्या बसची बांधणी मध्यवर्ती कार्यशाळेत  (ST Bus) मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पहिल्याच बसला तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला. काम पूर्ण होताच पासिंग करून बस नाशिक विभागातील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यासोबतच याच प्रणालीच्या बस बांधणीचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत 50 बसची बांधणी पूर्ण झाली आहे. बसच्या विविध विभागांचे काम सुरू आहे. यापैकी 9 बस या पासिंग होऊन प्रवाशांच्या सेवेसाठी तयार आहेत. वरिष्ठांचे आदेश येताच त्या सूचित केलेल्या जिल्ह्याला सोपविण्यात येणार आहेत.

ST Bus : माईकसह चार्जिंग पॉइंट

दरम्यान, या बसमध्ये समोर व पाठीमागे असे दोन डिजिटल बोर्ड राहणार असून चालकाजवळ माईक सिस्टम बसवण्यात आली आहे. या माईकमधूनच चालक प्रवाशांना वेळोवेळी काही सूचना असल्यास तो जागेवरच बसून देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. विशेष म्हणजे या नवीन बसमध्ये चार्जिंग पॉइंटही देण्यात आला आहे. तसेच हेडलाईटसाठी पारंपरिक बल्ब वापरण्याऐवजी एलईडी बल्बचा वापर करण्यात येत आहे. एकंदरीत एअर सस्पेन्शन, शून्य प्रदूर्षण, आणि आरामदायी बसमुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button