औरंगाबाद : मुलगी झाली-समृद्धी आली; लेक झाल्याचा असाही साजरा केला आनंद | पुढारी

औरंगाबाद : मुलगी झाली-समृद्धी आली; लेक झाल्याचा असाही साजरा केला आनंद

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : ‘मुलगी झाली – समृद्धी आली’ असे म्हणत औरंगाबादमधील झोंड-पवार परिवाराने मुलीच्या जन्माचे फुलांच्या, रांगोळीच्या पायघड्या टाकत, फुलांचा वर्षाव करीत जंगी स्वागत केले. समाजातील मुलगा व मुलगी असा भेदभाव आपण नाहीसा केला पाहिजे. वंशाला दिवा पाहिजे असा विचार न करता, दोन्ही घरांत प्रकाश देणाऱ्या मुलीच्या जन्माचे सर्वांनी आनंदाने स्वागत करावे, असे मत झोंड-पवार परिवाराने व्यक्त केले.

औरंगाबादमधील पोस्ट विभागात कार्यरत असणारे प्रवीण झोंड व त्यांच्या पत्नी विद्या यांना कन्यारत्न झाले. कन्यारत्न झाल्याचा आनंद म्हणून, तसेच राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधून पोस्ट विभागात कार्यरत असणाऱ्या प्रवीण झोंड यांनी सिल्लोड तालुक्यातील त्यांचे मूळ गाव असणाऱ्या गोळेगावमध्ये सुमारे ३० मुलींचे पोस्ट ऑफिसमध्ये सुकन्या समृद्धीचे खाते स्वखर्चाने उघडून दिले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच रेखा धनवट या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक अशोक धनवडे यांच्यासह गणेश बनकर, जावेद देशमुख, केशवराव झोंड, निवृत्ती तोडकर, स्वप्नील पवार, वैजीनाथ सावंत, भाऊसाहेब झोंड आदी उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी गणेश सोनवणे यांनी आभार मानले.

मुलीच्या रूपाने आमच्या घरी जिजाऊ, सावित्री, हा रमाई आणि फातिमाबी यांचा समर्थ वारसा सांगणारी वारसदार जन्मल्याचा आनंद आहे. आम्ही खूप आनंदी आहोत.
-विद्या-प्रवीण झोंड (बाळाचे आईवडील)

Back to top button