वाशिम : एका विद्यार्थ्यासाठी इथे चालते जिल्हा परिषद शाळा, शिक्षकही एकच; जाणून घ्या या शाळेविषयी (VIDEO) | पुढारी

वाशिम : एका विद्यार्थ्यासाठी इथे चालते जिल्हा परिषद शाळा, शिक्षकही एकच; जाणून घ्या या शाळेविषयी (VIDEO)

वाशीम (अजय ढवळे) : जिल्हा परिषदेची तुम्ही एखादी अशी शाळा बघितली का? ज्यामध्ये एक विद्यार्थी आणि त्या विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी केवळ एकच शिक्षक आहे. तर अशीच एक शाळा वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील गणेशपूर या गावात आहे. गावात गेल्या काही दिवसांपासून आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत प्रवेश घेण्याचा पालकांचा कल वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची शाळा ओस पडायला लागल्या आहेत. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने अन् पालकांनाही इंग्रजी शाळा परवडत नसल्याने या एका विद्यार्थ्यासाठी गणेशपूरची जिल्हा परिषद शाळा अविरत सुरु आहे.

गणेशपूर गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सध्या जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. या शाळेत एकच विद्यार्थी शिक्षण घेत आहे. याच विद्यार्थ्यांला शिकविण्यासाठी शाळेत एकच शिक्षक आहे. या शाळेत विद्यार्थी पटसंख्या नसल्याने हे एक शिक्षक या एकाच विद्यार्थ्यांला शिक्षणाचे धडे देतात. मात्र गावातील इतर मुलं जवळच्या कारंजा शहरातील इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी जातात. कार्तिक याच्या घरची परिस्थिती बेताची असून, त्याला गावातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घ्यावं लागत आहे. असे असूनही या शाळेत एकच शिक्षक त्याला शिकवतात, त्यामुळे येथे शिक्षण सुद्धा चांगल्या प्रकारे मिळत असल्याने तो नियमित शाळेत येतो.

शिक्षणाची ओढ असेल तर, मार्ग आपोआप सापडतो. शाळेत विद्यार्थ्याची संख्या एक असली तरी शाळा त्या एका विद्यार्थ्यासाठी उघडली जाते. विद्यार्थी अन् शिक्षक एक एक असले तरी दररोज ही शाळा भरते. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सरकारकडून ठोस उपाययोजना देखील राबविल्या जातात. एकीकडे सरकारी शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असताना दुसरीकडे कार्तिक मात्र न चुकता रोज वेळेच्यावेळी शाळेत हजर राहून आपलं शिक्षण पूर्ण व्हावं आणि पुढं चालून काही तरी बनावं ह्या हेतूने नियमित न चुकता शाळेत येतो.

गणेशपूर हे ग्रामीण भागातील गाव असून येथील लोकसंख्या दीडशेच्या जवळपास आहे. याच गावातील काही मुलं कारंजा येथे शिक्षण घेण्यासाठी जातात, मात्र कार्तिक हा तिसऱ्या वर्गात शिकत असून तो गावातील जिल्हा परिषद शाळेत जातो. मी पण माझे ज्ञानार्जनाचे काम अगदी प्रामाणिकपणे करत असल्याचे येथे शिकवणारे ते एक शिक्षक सागंतात. त्यामुळे मूले कितीही असो आपण आपलं काम सुरू ठेवलं पाहजे असेही ते म्हणतात.

Back to top button