पक्ष्यांनी माणसांना, तर माणसांनी अग्निशमन जवानांना दिली बचावाची हाक.. | पुढारी

पक्ष्यांनी माणसांना, तर माणसांनी अग्निशमन जवानांना दिली बचावाची हाक..

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सकाळी 6 वाजताची वेळ. पर्वती पायथा भागातील रमणा गणपती मंदिरासमोर पक्षी जोरजाेरत ओरडत होते. नागरिकांना लक्षात आले. आज पक्षी जरा वेगळ्या भाषेत ओरडत आहेत. घराबाहेर येऊन पाहतो तर एक भली मोठी घार मांज्यात अडकलेली… तिच्याभोवती पक्ष्यांचा प्रचंड कोलाहल सुरू. मग नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला फोन लावला. भली मोठी गाडी घेऊन पाच सहा जवान आले. त्यांनी भल्या मोठ्या लोखंडी काठीने प्रयत्नांची शिकस्त करीत घारीची सुटका केली. तिने जखमी अवस्थेतही उंच आकाशात भरारी घेताच पक्ष्यांचा कोलाहल थांबला अन‌् सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडत जवानांचे आभार मानले.

पक्ष्यांवर संकट आले तर ते आपल्या सांगत असतात, मदतही मागतात. पण, त्यांची भाषा समजली पाहिजे. रविवारच्या सकाळी पर्वती पायथ्याशी असलेल्या लक्ष्मीनगर भागातील रमणा गणेश मंदिराजवळची ही घटना आहे. नागरिकांचा दिवस उगवला तो पक्ष्यांच्या विचित्र कोलाहलाने, पहाटेपासूनच जोरजोरात ओरडत होते. नागरिकांना शंका आली की कुठेतरी काहीतरी झालेयं. पक्षी इतके का ओरडत आहेत. तेव्हा त्यांचे झाडावर लक्ष गेले.पाहिलं तर भली मोठी घार झाडावरच्या मांज्यात लटकलेली आहे. तिचा एक पंख मांज्यात अडकल्याने ती फासावर लटकवल्याप्रमाणे हतबल होऊन करुण नजरेने पाहत होती. तिच्याभोवती बिथरलेले, घाबरलेले पक्षी इकडून तिकडे उडत, ओरडत होते. जणू ते सांगत होते या घारीला काय झालंय पाहा..

पक्ष्यांनी माणसांना केले जागे..

लक्ष्मीनगर भागातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. जमिनीपासून खूप उंचावर घार मांज्यात अडकली होती. तिचा एक पंख मांज्यात अडकल्याने पक्ष्यांना काय करावे सुचत नव्हते. ते पहाटे पाचपासून कोलाहल करीत होते. नागरिकांनी अग्निशमन दलाला फोन लावला. साहेब, इथे एक घार पतंगाच्या मांज्यात अडकली आहे. आमच्या भागात पक्षी खूप ओरडत आहेत. ती खूप उंचावर लटकत आहे. तुमच्या मदतीशिवाय तिला वाचवणे अवघड आहे. हा कॉल पाहून नळस्टॉपजवळील अग्निशमन विभागाच्या जवानांची टिम सकाळी 7 वाजता भला मोठा बंब घेऊन आले.

माणसांनी केली त्यांची मदत…

त्यांनी घार लटकलेली पाहिली. पक्ष्यांचा कोलाहल पाहिला, अन‌् भली मोठी लोखंडी काठी काढली. ती पन्नास फूट उंच होती. त्या काठीवर आकडा होता. प्रथम त्यांनी जमिनीवर उभे राहून मांज्यात अडकलेल्या घारीला काढण्याचा प्रयत्न केला, पण काठी तिथपर्यंत पोहोचेना. मग त्यांनी भला मोठा बंब आणला, त्यावर उभे राहून त्यांनी घारीच्या भोवती अडकलेला मांज्या काढण्याचा प्रयत्न केला.

अन‌् घारीने घेतली उंच भरारी..

घारीला हळूहळू जवान आपल्याकडे खेचत होते तशी ती घाबरली. माणसांच्या हातात तिला जायचे नव्हते. जवानाच्या हाताशी येताच तिने पंखांची फडफड केली अन‌् तिच्या सुदैवाने मांज्यातून पंख निघाले. जखमी अवस्थेतही तिने आकाशात भरारी घेत या नाट्यावर पडदा टाकला. पक्ष्यांचा तीन तासांपासून सुरू असलेला कोलाहल थांबला अन‌् जमलेल्या माणसांनी टाळ्यांचा कडकडाट करीत अग्निशमन जवानांचे आभार मानले.

Back to top button