नगर : प्राचार्य राजेंद्र बर्डे यांचे अपघातामध्ये निधन | पुढारी

नगर : प्राचार्य राजेंद्र बर्डे यांचे अपघातामध्ये निधन

राहाता : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चितळी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र बर्डे (वय 52 वर्षे) यांचे गुरुवारी रात्री 8 वाजता अपघातात निधन झाले. गुरुवारी रात्री 8 वा. साकुरी शिवारातून नगर- मनमाड महामार्गावरून राहाता येथील घराकडे स्वतःच्या चार चाकी अल्टो वाहनातून जात असताना त्यांच्या गाडी पुढे असलेल्या टेम्पोला मागून जोराची धडक दिल्यामुळे बर्डे यांच्या वाहनाचे अपघातात मोठे नुकसान झाले. जोराची धडक बसल्याने बर्डे यांच्या डोक्यासह शरीराला मोठ्या प्रमाणात इजा झाली.

अपघातानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी शिर्डी येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बर्डे यांच्या निधनाची वार्ता समजताच रुग्णालयात परिसरातील शिक्षक व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या निधनाने रयत शिक्षण संस्थेसह परिसरात शोककळा पसरली आहे. रयत शिक्षण संस्थेत अभ्यासू व संस्था प्रगतीवर नेण्यास स्व. बर्डे यांचे नाव रयत शिक्षण संस्थेत अग्रक्रमाने घेतले जात होते. स्व. बर्डे राहाता तालुक्यातील जळगाव येथील मुळचे रहिवासी होते. राहाता येथील महाविद्यालयात स्व. बर्डे यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार सांभाळला. राहाता येथे विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यात ते पुढे होते. सुसज्ज इमारत उभारण्यात त्यांचा सहभाग होता.

Back to top button