पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी कल्याण-डोंबिवलीमधून १०० पेक्षा अधिक बसेस | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी कल्याण-डोंबिवलीमधून १०० पेक्षा अधिक बसेस

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरूवारी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई येथे अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार असून बीकेसी येथे त्यांची सभाही होणार आहे. या सभेत गर्दी व्हावी आणि पंतप्रधानांचे भाषण कार्यकर्त्यांना ऐकता यावे यासाठी भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात परिवहन मंडळाच्या जवळपास १०० हून अधिक बसेस सोडण्यात येणार आहेत. यासाठी डोंबिवली येथील बस स्थानकातून जवळपास ४० बसेस सोडण्यात येणार आहेत. तर बाकीच्या बसेस कल्याण येथून सोडण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मुंबई दौऱ्यावर येत असून दोन मेट्रो मार्गांचेही उद्घाटन होणार आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्राचे एकनाथ शिंदे सरकार आणि भाजप तयारीच्या कामात व्यस्त आहे. महाराष्ट्रात सरकार बदलल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने तो यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि शिंदे गटाने आपली पूर्ण ताकद लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या बीकेसीमध्ये आयोजित सभेत लाखो नागरिक सामील होतील याची जोरदार तयारी करण्यात आली असून याच पार्श्वभूमीवर कल्याण- डोंबिवली परिसरातील भाजप व शिंदे गटातील नेत्यांनी १०० हून अधिक एसटी आगार व केडीएमसी आणि खाजगी बसेस बुक केल्या आहेत.

आज दुपारनंतर या सर्व बसेस कल्याण-डोंबिवली परिसरातील नगरसेवक, पदाधिकारी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांना पुरविल्या जाणार आहेत. या बसच्या माध्यमातून कल्याण- डोंबिवलीमधून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक मुंबईच्या बीकेसी ग्राउंडवर नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी येणार आहेत. या बसेस प्रत्येक वॉर्डमध्ये पाठवण्यात येणार असून नागरिकांच्या सोयीने या बसेस उभ्या करण्यात येतील, असे पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button