काँग्रेसनंतर भाजपकडून मोठ्या घोषणा?; लोकप्रिय योजना देऊ केल्यामुळे कर्नाटकात भाजप अस्वस्थ | पुढारी

काँग्रेसनंतर भाजपकडून मोठ्या घोषणा?; लोकप्रिय योजना देऊ केल्यामुळे कर्नाटकात भाजप अस्वस्थ

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा ;  आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणून काँग्रेसने प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज, प्रत्येक कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक २ हजार रुपये अशा घोषणा गेल्या आठ दिवसांत केल्या आहेत. या घोषणांनी सर्वसामान्य लोकांच्या मनात काँग्रेसबद्दल आपुलकी निर्माण झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम दिसून येईल, असा अहवाल गुप्तचर विभागाने सरकारकडे दिला आहे. त्यामुळे भाजप श्रेष्ठींपुढे चिंता निर्माण झाली असून अशाच प्रकारच्या काही योजना भाजपही जाहीर करण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार म्हणून प्रजाध्वनी यात्रा बेळगावातूनच सुरू करताना घेऊन काँग्रेसने दोन महत्त्वाची आश्वासने दिली आहेत. बेळगावातील सभेत प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर बंगळूर येथे झालेल्या महिलांच्या मेळाव्यात प्रियांका गांधी यांनी महिला कुटुंबप्रमुखाला मासिक २ हजार रुपये देण्याची घोषणा केली. या दोन्ही घोषणांची चर्चा राष्ट्रीय पातळीवर सुरु आहे. तसेच जनसामान्यही या योजनांकडे आकृष्ट होत असल्याची माहिती गुप्तचरांनी राज्य सरकारला, भाजप श्रेष्ठींना दिली आहे.

गुजरात, उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये हिंदुत्वाचा भावनात्मक प्रचार उपयोगी पडला. कर्नाटकातील किनारपट्टी भागात हिंदुत्वाचा परिणाम जाणवतो. पण, राज्याच्या उर्वरित भागात फारसा परिणाम झालेला नाही. काँग्रेसच्या मोफत योजनांच्या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. यावर आता भाजप श्रेष्ठी विचार करत आहेत. नवी दिल्लीत दोन दिवस भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसला प्रत्युत्तर देण्याविषयी चर्चा करण्यात आली. अशाच प्रकारच्या योजना सरकारने घोषित कराव्यात. केवळ आश्वासन न देता त्याची पूर्तता करण्याची हमीही द्यावी. यासाठी सर्वांनी कामाला लागण्याची सूचना या बैठकीत देण्यात आली.

बीपीएल कार्डधारकांना २ हजार ?

पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या सूचनेनुसार मंत्रिमंडळ बैठकीत सल्लामसलत केली जाणार आहे. मोठ्या प्रमाणात प्रचार करुन काही लोकप्रिय योजना जारी केल्या जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक बीपीएल कार्डधारकांना मासिक २ हजार रुपये मदतीच्या घोषणेची शक्यता आहे. जूनपासून योजना जारी करण्याचे जाहीर करण्याचा विचार केला जात आहे.

सायकल, बूटची रक्कम विद्यार्थ्यांना मिळणार

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून मोफत सायकल विरतण योजना, बूट- सॉक्स वितरण योजना स्थगित आहे. या योजना सुरु करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली पण, आर्थिक स्थितीचा विचार करुन त्याकडे लक्ष देण्यात आले नव्हते. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायकल आणि बूट योजनेची रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची तयारी केली जाणार आहे.

Back to top button