इंदापूर : निवडणूक पुढे ढकलल्याने जनतेचे नुकसान; खा. सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन | पुढारी

इंदापूर : निवडणूक पुढे ढकलल्याने जनतेचे नुकसान; खा. सुप्रिया सुळे यांचे प्रतिपादन

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची सुनावणी पुढे गेली यात आश्चर्य वाटत नाही. या निवडणुकांत ईडी सरकारला यश मिळणार नाही, हे मी सातत्याने सांगते आहे. कुठेल ना कुठले कारण सांगून हे सरकार निवडणूक पुढे ढकलत आहे. यात सर्वसामान्य लोकांची अडचण होते. त्यांनी जायचे कुणाकडे, यात नुकसान जनतेचे होत आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

कौठळी (ता. इंदापूर) येथे बुधवारी (दि. 18) झालेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, माजी सभापती प्रवीण माने, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, अभिजीत तांबिले, श्रीमंत ढोले, अतुल झगडे, रेहाना मुलाणी, छाया पडसळकर, प्रवीण डोंगरे आदी उपस्थित होते. सरपंच राणी मारकड, उपसरपंच सुनील खामगळ यांनी उपस्थितांचा सत्कार केला. सूत्रसंचालन डॉ. नीलेश धापटे यांनी केले.

काळाबरोबर बदलायला हवे
यावेळी हळदी-कुंकाचा कार्यक्रम झाला. खा. सुळे यांनी प्रथम विधवा महिलेकडून स्वतःला हळदी कुंकू लावून घेतले. विधवा महिलेला एकल महिला किंवा माउली म्हणा. तिचा सन्मान झाला पाहिजे. अंधश्रद्धेतून श्रद्धेकडे येणे ही सामाजिक परिवर्तनाची सुरुवात आहे. काळाबरोबर बदलले पाहिजे, असे सुळे यांनी सांगितले.

वरची माणसे आता खाली आली….
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची नियुक्ती पुणे जिल्हा नियोजन समितीवर झाली आहे. याचा संदर्भ घेत व त्यांचे नाव न घेता आमदार भरणे म्हणाले, वरची माणसे आता खाली आली. आमचा कार्यकर्ता सचिन सपकळच्या जागेवर काही लोक आलेत. कोणत्याही कार्यक्रमात फोटोमध्ये डोकावणे, आताच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणे झाले असे सांगत न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विरोधक करतात, असा टोला त्यांनी लगावला.

Back to top button